मुंबई, 16 ऑगस्ट : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवलेले कलाकार म्हणजे राणा दा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर.येणाऱ्या काळात हि जोडी लग्नबंधनात अडकणार असली तरी लवकरच अजून एकदा एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आजपर्यंत टीव्हीवर गाजलेली हि जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. लवकरच हे दोघे एकत्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. नुकतंच या दोघांच्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक आणि अक्षया येत्या काळात सिल्वर स्क्रीनवर एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘चतुर चोर’ असं त्यांच्या नव्याकोऱ्या सिनेमाचं नाव आहे. नुकतंच त्यांच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. सध्या तरी ‘चतुर चोर’ हा हॉरर कॉमेडी असलेला सिनेमा असल्याचं समोर आलं आहे. नुकताच लंडनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडल्याचं सांगण्यात येत आहे.
आता हार्दिक आणि अक्षया यांचा हा चित्रपट कसा असणार, या दोघांच्या भूमिका नेमक्या काय असतील, चित्रपटाचं कथानक नेमकं काय असेल याच्याबद्दल येणाऱ्या काळात माहिती मिळेल. सध्यातरी या दोघांचे चाहते प्रचंड खुश आहेत. या दोघांना मालिकेनंतर पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेही वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीने पाळली घराण्याची परंपरा; चाहत्यांकडून होतंय कौतुक हार्दिक आणि अक्षया यांच्या जोडीने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून समोर येत प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून टाकलं होतं. या मालिकेने बरीच लोकप्रियता मिळवली तसंच अक्षया आणि हार्दिकच्या म्हणजे राणा दा आणि अंजलीबाईंच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग सुद्धा तयार झाला. काहीच महिन्यांपूर्वी या ऑन स्क्रीन दिसणाऱ्या कपलने खऱ्या आयुष्यात सुद्धा साखरपुडा करत एकमेकांना जोडीदार म्हणून निवडल्याचं जाहीर केलं होतं. हार्दिक आणि अक्षया यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर हार्दिक अलीकडेच झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता तर अक्षया ‘हे तर काहीच नाय!’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालक झळकली होती. आता चित्रपटात या दोघांनाही अतिशय नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.