मुंबई, 8 सप्टेंबर- आशा भोसले या प्रतिभावान व्यक्तिमत्व आहेत. आपल्या आवाजाने त्या सर्वांनाच मंत्रमुग्ध करतात. आशा भोसले या उत्तम गायिका तर आहेतच, पण त्यांच्या हातात अशी जादू आहे की, की त्यांच्या हातचे पदार्थ खाणारे कधीच विसरत नाहीत. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताई एक पार्श्वगायिका, उद्योजिका, अभिनेत्रीदेखील आहेत पण फारच कमी लोकांना माहिती आहे की त्या एक उत्तम सुगरणदेखील आहेत. त्यांना विविध खाद्यपदार्थ बनवायला आवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांच्या आयुष्यात प्रचंड चढ-उतार आले. त्यांचं बालपण फारसं सुखाचं नव्हतं. गायिका म्हणून आपलं स्थान निर्माण करणं आशाताईंसाठी सोपं नव्हतं. पण आज आपण आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या इतर कौशल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या इतर कौशल्यांबाबत तुम्हाला माहिती असेल. आज आपण त्यांच्या पाककलेबाबत जाणून घेणार आहोत. आशा भोसले यांचा आवाज जितका दमदार आहे तितकीच त्यांच्या हातालादेखील चव आहे. आशा ताईंना स्वयंपाकाची खूप आवड आहे. अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या हातचं कढई मटण आणि बिर्याणी आवडते. एका मुलाखतीत आशाताईंनी स्वतः सांगितलं होतं की, जर त्या गायिका नसत्या तर एक उत्तम कुक असत्या. आशा भोसले यांना गायनात दादासाहेब फाळके, पद्मविभूषण यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. पण गायनासोबतच त्यांनी त्यांचा स्वयंपाकाचा छंदही जोपासला आहे.
(हे वाचा: Life@25 Asha Bhosale : 16व्या वर्षी पळून लग्न; पन्नाशीत जुळले पंचम दांशी सुर, आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाईफ **)** आशा भोसले या रेस्टॉरंट चेनच्या मालकीण आहेत. या दिग्गज गायिका दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाने रेस्टॉरंट चालवतात. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीन येथेही त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. या रेस्टॉरंटमध्ये खास भारतीय पदार्थ बनवले जातात. इतकंच नव्हे तर आशाताई स्वतः या रेस्टॉरंट्सच्या शेफना ट्रेनिंग देतात. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कुक रसेल स्कॉट यांनी आशा ब्रँडचे हक्क यूकेसाठी विकत घेतले आहेत. या अंतर्गत आशा नावाने सुमारे 40 रेस्टॉरंट सुरु करण्याची योजना आखण्यात येत आहे.