मुंबई, 21 जुलै : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख हे चित्रपटसृष्टीतील सर्वात क्यूट कपल मानले जाते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. हे दोघे शेवटचे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसले होते, पण त्याआधी जेनेलियाने लग्नानंतर बरीच वर्षे काम केले नाही. तिने आजवर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता जिनिलिया लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. जिनिलिया ‘ट्रायल पीरिअड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जिनिलियाने रितेशच्या आगामी चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंडच आला आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. रितेश देशमुखने 2020 मध्ये याबद्द्ल सांगितलं होतं. आता नुकतंच जेनेलिया डिसूझानेही याला दुजोरा दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जिनिलियाने हा चित्रपट तयार होत असल्याचा खुलासा केला आहे, पण त्याला अजून बरेच दिवस लागणार असल्याचं देखील तिनं सांगितलं. जिनिलिया म्हणाली, ‘हा चित्रपट रितेश देशमुखच्या मनाच्या खूप जवळ आहे. या एका चित्रपटासाठी तो आपलं आयुष्य समर्पित करायला तयार आहे. त्यामुळे हा चित्रपट आज ना उद्या नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल त्यात काही शंकाच नाही.’ असं जिनिलियाने म्हटलं आहे. Sankarshan Karhade : ‘तिघेही वेगळ्या पक्षाचे पण…’ महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीवर संकर्षण कऱ्हाडेचं भाष्य चर्चेत 2020 मध्ये रितेश देशमुख आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ट्रायलॉजी चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. हा चित्रपट अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. 19 फेब्रुवारी 2020 रोजी रितेशने ट्विट करून ही माहिती दिली होती. तर या चित्रपटाला अजय अतुल यांचं संगीत असणार आहे. आता या चित्रपटात रितेश महाराजांच्या भूमिकेत दिसणार का हे पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक झाले आहेत.
सध्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट येणार आहेत. त्यात ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षक सर्वात जास्त उत्सुक असून त्यांचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून अक्षय मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तसंच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.