मुंबई, 30 जून: दी फॅमिली मॅनच्या (Family Man) दुसऱ्या सीझनमध्ये साजिदची (Sajid) भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाहब अलीचं (Shahab ali) उत्तम अभिनयाबद्दल सर्वच क्षेत्रांतून कौतुक होत आहे. मालिकेच्या चाहत्यांकडून आलेले साजिदचे स्केचेस, व्हिडिओ क्लिप्स आणि कौतुकाच्या संदेशानी आपलं इनबॉक्स ओसंडून वाहत असून, ते बघून खूप आनंद होत असल्याचं शाहब अलीनं म्हटलं आहे. ‘मला याची अपेक्षा होती; पण इतक्या मोठ्या प्रमाणात कौतुक होईल असं वाटलं नव्हतं. चाहत्यांचं हे प्रेम, कौतुक माझ्यासाठी खूपच जबरदस्त आहे,’ अशी प्रतिक्रिया शाहबनं व्यक्त केली आहे. मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आलेल्या शाहबनं मोठ्या संघर्षानंतर हे यश मिळवलं आहे. ‘फॅमिली मॅन’नं त्याला ओळख मिळवून दिली असली, तरी आर्थिकदृष्ट्या त्याला फार फायदा झालेला नाही. फॅमिली मॅन प्रदर्शित होण्यापूर्वी लॉकडाउनमुळे काम बंद असल्यानं त्याला आपला मुंबईतला फ्लॅट सोडून दिल्लीला परत जावं लागलं आहे. आर्थिक संकटामुळे त्याच्यावर ही वेळ आली. आता नवीन कामं मिळण्यास मदत होईल आणि परिस्थिती सुधारेल अशी त्याला आशा आहे. दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शाहबचा अभिनय क्षेत्रातील आतापर्यतचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. दिल्ली विद्यापीठात पथनाट्यांपासून (Street Play) अभिनयाची सुरुवात करणाऱ्या शाहबला आर्थिक अडचणींमुळे कायमस्वरूपी मुंबईत येणं शक्य नव्हतं, मात्र तो इथं येऊन ऑडिशन देत होता. त्यादरम्यान, त्यानं पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका वर्षासाठी वर्तमानपत्रात नोकरी केली; पण त्यात मन रमत नसल्यानं त्यानं आपल्या आवडीच्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला त्याच्या आईनं पाठिंबा दिला. त्याने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेशासाठी (NSD) अर्ज केला आणि 2015मध्ये तिथून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘म्हातारं होणं गुन्हा आहे का?’ वय झाल्यानंतर बॉलिवूड दखल घेत नाही; शरत सक्सेना.. झांगूरा या देशातल्या पहिलं ब्रॉडवे-शैलीतल्या संगीत नाटकामध्ये त्याची निवड झाली. 2018पर्यंत जवळपास तीन वर्षं त्यानं ते नाटक केलं. त्यानंतर मुंबईत मुघल-ए-आझम या भव्य संगीतनाट्याचा तो मुख्य भाग बनला. यात तो सलीमची भूमिका साकारत असे. अजूनही तो या शोचा एक भाग आहे. अभिनय करण्याचा निर्णय पक्का केला तेव्हा त्याचा करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं हा संघर्ष संपला होता; पण तिथूनच करिअर घडवण्याच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. दोन्ही संगीत नाट्यांनी त्याला स्थिरता दिली, कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी बळ दिलं. त्यामुळे त्यानं दिल्लीहून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला; पण त्याच्यासाठी हे खूप मोठं पाऊल होतं. त्याच्या करिअरला ‘फॅमिली मॅन’ सीरिजमुळे मोठा हातभार लागला असला तरी सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आर्थिक फटकाही त्याला बसला आहे; मात्र आता नवीन कामं मिळतील आणि परिस्थिती सुधारेल अशी त्याला आशा आहे. अतिरेकी साजिदच्या भूमिकेबद्दल बोलताना शाहब अली म्हणाला, ‘माझ्यासाठी साजिद हे अँटी-हिरो आणि व्हिलनच्या यांच्यामध्ये फिरणारे पात्र आहे. मी त्याच्या तीव्रतेवर काम केलं. मी काही कार्यशाळा केल्या आणि स्वत:चा अनुभवही भूमिकेत ओतला. लूकसाठी 6-7 किलो वजन वाढवलं. साजिद फारसा अभिव्यक्त होणारा नसल्यानं मी निर्विकार राहण्यावर काम केलं. दिग्दर्शकांच्या सूचनांनुसार बॉडी लँग्वेजवर काम केलं.’ ग्रे शेडच्या भूमिकेनं मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, ‘माझ्यावर याचा परिणाम होतो. ही भूमिका करताना मी खूप गंभीर झालो. मी घरी परत यायचो तेव्हा लोक मला विचारत असत, की ‘तू इतका गंभीर का आहेस?’ मी हास्यविनोद करत नसे, जास्त हसत नसे. एखाद्या भूमिकेत शिरल्यानंतर त्यातून बाहेर पाडण्यासाठीही मला जास्त वेळ लागतो. साजिदसारखी व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वावरही त्याचा परिणाम होतो.’ एकेकाळी भाड्याच्या एका खोलीत राहत होती नेहा कक्कर; आज आहे कोट्यवधींचा बंगला ‘फॅमिली मॅन’मध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत, परदेशात अनेक ठिकाणी त्याचं शूटिंग झालं आहे, याबाबत बोलताना शाहब अली म्हणाला, ‘हा पॅन इंडिया शो आहे. फक्त ठिकाणं मोजली तर आम्ही चेन्नई, लंडन, मुंबई, बारामती, माडोली, काश्मीर आणि लडाखमध्ये शूटिंग केलं आहे. गुणवत्तेच्या बाबतीत निर्माते आणि चॅनेल यांची भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट होती. स्क्रिप्टिंग आणि शूटिंगला ते भरपूर वेळ देतात. पोस्ट-प्रॉडक्शनमध्येसुद्धा कॅनव्हास खूप मोठा आहे आणि तो स्क्रीनवरही दिसून येतो. या मालिकेमागील दृष्टी खूप व्यापक आहे.’ शाहब आता एमएक्स प्लेयरवरील एका मालिकेत झळकणार असून, यात तो मालिकेच्या दुसर्या पर्वात सहभागी झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही मालिका प्रदर्शित होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.