मुंबई, 19 जुलै- बॉलिवूड नवदाम्पत्य रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. ब्रह्मास्त्रमध्ये आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत हे आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे. परंतु आता एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. पिंकविलाच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. इतकंच नव्हे तर तिला या चित्रपटाच्या सिक्वेलसाठीदेखील तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या वेबसाईटने असा दावा केला की, दीपिका ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारणार आहे. सूत्राने सांगितलं की, निर्मात्यांनी पार्वतीची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पादुकोणची निवड केली आहे. याशिवाय दीपिका ब्रह्मास्त्रच्या शेवटी कॅमिओदेखील करणार आहे.मात्र याबाबत स्टार कास्ट किंवा मेकर्सनी अद्याप कोणतीही अधिकुत घोषणा केलेली नाहीय. ‘ब्रह्मास्त्र 2’ ची कथा महादेव आणि पार्वती या दोन पात्रांभोवती फिरणार असल्याचा दावाही या वेबसाईटने केला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शिव आणि ईशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जी देवी पार्वती आणि भगवान शिव यांचीच दुसरी नावे आहेत. यावरून चित्रपटातील सर्व पात्रे एकमेकांशी संबंधित असतील हे स्पष्ट झालं आहे.सध्या सोशल मीडियावर यासंबंधित काही फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. (**हे वाचा:**
HBD Bhumi Pednekar : वडील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तर आई तंबाखूविरोधी कार्यकर्ती, जाणून घ्या भूमीविषयी ‘या’ खास गोष्टी
) या वेबसाईटला एका सूत्राने माहिती देत सांगितलं की,या चित्रपटाची ‘सर्व पात्रे एकमेकांत गुंफलेली आहेत. हे अयानचे स्वतःचे विश्व आहे ज्याचे मूळ भारतीय पौराणिक कथांमध्ये आहे. हे जग याआधी जागतिक सिनेमात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळं असणार आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ब्रह्मास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हाही दीपिका या चित्रपटाचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.