मुंबई 16 जुलै: दादा एक गुड आहे नाटकातून हृता दुर्गुळे (Hruta Durgule exit from dada ek good news aahe) या अभिनेत्रीने बाहेर पडायचा निर्णय घेतल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. नाटक एकदम जोमात चालू असताना, नाटकाचे दुबई सारख्या ठिकाणी दौरे होत असतानाही काही प्रोफेशनल कारणांनी हृताने नाटक सोडायचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. या नाटकतात मृगा बोडस या अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं दिसून येत आहे. मृगाचं स्वागत एका हटके पद्धतीने करत नाटकाच्या टीमने विशेष व्हिडिओ बनवला आहे. दादा एक गुड आहे नाटकाच्या टीमने खास ‘क्युंकी सास भी कभी बहू ठी’ या मालिकेतील शीर्षक गीताची आयडिया घेऊन त्याच गाण्यावर मस्त व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रिया बापट ही अभिनेत्री मृगाचं स्वागत करताना दिसत आहे. आज मृगाचा या नाटकाचा पहिला प्रयोग पनवेल इथे सादर झाला. या टीमने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून नव्या मेम्बरचं टीममध्ये स्वागत केलं आहे. तसं पाहिलं तर आशुतोष गोखले हा अभिनेता सुद्धा टीमचा भाग नव्हता. त्याचं पात्र आधी ऋषी मनोहर हा अभिनेता साकारत होता. या निमित्ताने त्याचही पुन्हा एकदा स्वागत करण्यात आलं. हे ही वाचा- Ankita Lokhande: अंकिताचा नवा लुक बघून चाहत्यांना आठवलं गोणपाट अन् गोधडी, ट्रोल करत म्हणाले… ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक त्याच्या सुंदर विषयासाठी आणि त्याच्या कमाल मांडणीसाठी ओळखलं जातं. या नाटकात भाव बहिणीचं सुंदर नातं आणि त्यांची गोड कथा दाखवण्यात आली आहे. हृतां दुर्गुळे, उमेश कामत, आरती मोरे आणि आशुतोष गोखले ही स्टारकास्ट हे नाटक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात असं अनेकांचं म्हणणं आहे. हृताचं या नाटकातील काम प्रेक्षकांकडून तसंच खास करून तरुण पिढीकडून सुद्धा खूप पसंत केलं जात होतं. हृताची जागा घेणारी ही अभिनेत्री मृगा बोडस याआधी ‘धनंजय माने इथेच राहतात का’ नाटकात काम दिसून आली होती. तसंच तिने स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेत ताराबाईंची भूमिका साकारली होती. मृगाचा आज नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.
वर्क फ्रंटवर ऋता दुर्गुळे सध्या अनन्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसंच तिचा टाईमपास 3 हा सिनेमा सुद्धा येत्या महिन्याच्या शेवटी रिलीज होणार आहे. हृता काम करत असलेली प्रसिद्ध मालिका ‘मन उडू उडू झालं’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हृताने दोन कलाकृतींमधून एकाच वेळी निरोप घेतल्याने सध्या चर्चाना उधाण आलं आहे.