मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतच्या आत्महत्येमुळं संदीप होता अस्वस्थ; सुचितानं केला खळबळजनक खुलासा

सुशांतच्या आत्महत्येमुळं संदीप होता अस्वस्थ; सुचितानं केला खळबळजनक खुलासा

Sandeep Nahar

Sandeep Nahar

अभिनेत्री सुचितानं संदीप नाहरच्या मृत्यूपुर्वीची एक खळबळजनक माहिती दिली. अभिनेता सुशांतच्या आत्महत्येमुळं अनेक दिवस तो अस्वस्थ होता.

मुंबई, 17 फेब्रुवारी: अभिनेता संदीप नाहरनं (Sandeep Nahar) सोमवारी (15 फेब्रुवारी) आत्महत्या (Suicide) केली. वयाच्या अवघ्या तिशीत असलेल्या या अभिनेत्यानं अक्षयकुमारच्या 'केसरी'मध्ये, तसंच सुशांतसिंह राजपूत (SushantSingh Rajput) अभिनित 'एमएस धोनी - दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटांत अभिनय केला होता. सोमवारी सायंकाळी त्याच्या फ्लॅटमध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याची पत्नी कांचन आणि मित्रांनी त्याला एसव्हीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं; मात्र तो मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पोलिसांनी ही माहिती दिली.

'कहने को हमसफर है'मध्ये तीन वर्षं संदीपसोबत काम केलेली त्याची सहकलाकार सुचिता पिल्लई (Suchita Pillai) हिने संदीपच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून, तिला या घटनेने धक्का बसला आहे. 'हे खरं आहे यावर विश्वासच बसत नाही. आम्ही या शोमध्ये तीन वर्षं एकत्र काम केलं. सेटवरच्या सर्वांत मिळून-मिसळून वागणाऱ्या व्यक्तींपैकी तो एक होता. सतत काही तरी विनोद करून तो आम्हाला हसवत असायचा. त्याच्या आनंदी चेहऱ्यामागे किती वेदना होत्या, ते आम्हाला या घटनेमुळे कळलं,' असं सुचिताने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

सुचिता म्हणाली, की संदीप त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा करिअरमधल्या अडचणींबद्दल कधीही सेटवर तक्रारी करायचा नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याला खूप मोठा धक्का बसला होता. 'कोणी अशी गोष्ट का करू धजावतं,' असा सवाल त्याने केला होता. त्या आत्महत्या प्रकरणाचा त्याच्यावर खूपच परिणाम झाला होता. त्यामुळे त्याने स्वतःही हे पाऊल उचलल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे, असंही सुचिता म्हणाली.

हे देखील वाचा -   ‘माझीही मुलगी स्ट्रगल करतेय’; घराणेशाहीच्या वादात सुप्रिया पिळगांवकर यांची उडी

संदीपने आत्महत्येआधी काही तास एक व्हिडिओ आणि एक सुसाइड नोट (Suicide Note) फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यात त्याने स्वतःच्या पत्नीला यासाठी जबाबदार धरलं होतं. तसंच, बॉलिवूडमध्ये आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या राजकारणाबद्दलही त्याने सांगितलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संदीपने आत्महत्येच्या सुमारे तीन तास आधी हा व्हिडिओ केला असावा. संदीपच्या मृत्यूचं नेमकं कारण कळण्यासाठी आपण पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची (Post Mortem Report) वाट पाहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'बॉलिवूडमध्ये अनप्रोफेशनल पद्धतीने काम केलं जातं, या उद्योगात काम करणाऱ्यांकडे भावनांचा अभाव आहे,' असं संदीपने त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं.

First published:

Tags: Bollywood News, Sandeep nahar, Suicide case