मुंबई, 05 मे: ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Marathi Movie) ही कलाकृती प्रेक्षकांच्या स्वाधिन केल्यानंतर आता यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यावर दिसणारे तसंच पडद्यामागील सर्वच कलाकार चंद्रमुखीचं यश साजरं करत आहेत. चंद्रमुखी हा सिनेमा काहीच दिवसात सुपरहिट ठरला आहे. सिनेमागृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चे (Chandramukhi Houseful) बोर्ड लागले आहेत आणि हेच या सिनेमाच्या टीमच्या मेहनतीचं फळ आहे. दरम्यान या सिनेमाचा ‘टायटल रोल’ करणारी अमृता खानविलकर हिने ‘चंद्रमुखी’चा दिग्दर्शक प्रसाद ओकसाठी (Amruta Khanvilkar and Prasad Oak) एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट या सिनेमातील सवाल-जवाबाच्या गाण्याशी संबंधित आहे. त्यामुळेच की काय पण अमृताच्या या पोस्टवर प्रसाद ओकने दिलेला ‘जवाब’ही सुंदर आहे. अभिनेत्री अमृता खानविलकने या पोस्टमध्ये ‘सवाल-जवाब’च्या शूटिंगवेळचा एक व्हिडीओ आणि प्रदर्शित गाण्याच्या व्हिडीओचा छोटासा भाग एडिट करुन शेअर केला आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनावेळी प्रसाद ओकने अमृताला हावभावांसह कशी शिकवणी दिली हे या व्हिडीओतून दिसते आहे. तर अमृतानेही प्रसाद ओकच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी पार पाडल्याने दिसून येते आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता म्हणते की, ‘#चंद्रासांगतेएका. किती वर्णू गं महिमा त्याचा….. ह्या एका वाक्यात सगळं आलं… प्रसाद ओक कादंबरी देण्यापासून ते हे शेवटचं गाणं करण्यापर्यंत… तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.. मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन…’ हे वाचा- ‘चंद्रमुखी’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,कमावले तब्बल इतके कोटी अमृता खानविलकरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मात्र लक्ष वेधून घेणारी ठरली ती प्रसाद ओकची प्रतिक्रिया. ‘चंद्रा’च्या या पोस्टवर प्रसाद ओक म्हणतो की, ‘गानं ऐकलंय तिचं… नाच पायलाय तिचा.. निस्ती चांगली न्हाय… त लैच भारी “कलावंतीन” हाय आमची “चंद्रा”. फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची “चंद्रा”. आशीच ऱ्हा “चंद्रा” वानी, म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं..!!!! लै लै लै म्हंजी लैच पिरेम’. अमृताच्या या पोस्टवर आणि प्रसाद ओकच्या या कमेंटवर लाइक्सचा पाऊस पडला आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय-अतुलचे संगीत तर गुरू ठाकुरने यातील सुंदर गाणी लिहिली आहेत. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे. मेट्रोपासून विमानापर्यंत या सिनेमाने प्रमोशनमध्ये देखील कमाल केली आहे. आज सोशल मीडियावरही ‘चंद्रा’, ‘बाई गं..’, ‘तो चांद राती..’ ‘सवाल-जवाब’ या सर्वच गाण्यांवरील व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत, व्हायरल होत आहेत. सध्या थिएटर्समध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला असताना मराठी सिनेमाला प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळणं ही मोठी पोचपावती मानली जात आहे.