मुंबई, 5 मे- अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Box Office Collection) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रसाद ओकने (Chandramukhi Director Prasad Oak) शेअर केलेल्या काही इन्स्टाग्राम पोस्टनुसार ‘चंद्रमुखी’ अनेक चित्रपटगृहात ‘हाऊसफुल्ल’ असल्याचं दिसून येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडल्याचं दिसून येत आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन नुकतंच समोर आलं आहे. 29 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास 5 कोटी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या सर्वात मोठ्या म्युझिकल पीरियड ड्रामा ‘चंद्रमुखी’चे यश केवळ निर्माते, कलाकार आणि क्रू यांच्यापुरते मर्यादित नाही. तर मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवण्याची अफाट क्षमता या चित्रपटाने दाखवून दिली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दक्षिण भारतीय चित्रपटांची पाऊले देशभरात अधिक घट्ट होत असताना, आता ‘चंद्रमुखी’मुळे मराठी चित्रपटांचा भारतीय सिनेविश्वात एक वेगळीच ओळख निर्माण होताना दिसत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक होते. चित्रपटाचं जोरदार प्रमोशनसुद्धा झालं होतं.
चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ‘चंद्रमुखीने ज्या प्रकारे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तसं नेहमीच लक्ष दिलं जात नाही. इंडस्ट्रीने असे चित्रपट पाहिलेले नाहीत आणि आमच्या चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद मला खूप प्रोत्साहन देतो. मराठी इंडस्ट्रीला मुख्य प्रवाहात पाहणे खूप छान आहे आणि चंद्रमुखी या इंडस्ट्रीत नवीन काळ सुरू करेल की नाही याचा विचार करू शकतो’.