मुंबई, 29 जुलै : झी मराठीवर नवीन सुरू होणाऱ्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच प्रचंड चर्चा आहे. हा कार्यक्रम खास महिलांसाठीच असणार आहे आणि पहिल्याच एपिसोडमध्ये बसमध्ये आलेल्या सुप्रिया सुळेंनी धम्माल उत्तरं दिलेली दिसतायत. या कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठीने प्रसिद्ध केला आणि राजकारणामागच्या चर्चांना उधाण आलं. बस बाई बस या कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध महिला सहभागी होणार आहेत. एवढंच नाही तर इतर महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना भाग आहे. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. गप्पा आणि मुलाखत अशा वेगळ्या धाटणीच्या या शोचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला आहे. पहिल्या भागात महिला सेलिब्रिटी म्हणून खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. सुप्रिया सुळेंनी महिलांच्या सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तरं देत कार्यक्रम एन्जॉय केला. त्यांनी दिलेल्या या उत्तरांची आणि मारलेल्या गप्पांची आता सगळीकडे प्रचंड चर्चा होतेय. या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना नरेंद्र मोदींचा फोटो दाखवला आणि त्यांच्याबरोबर बोलायला सांगितलं. तर सुप्रिया सुळेंनी मोदींसोबत चक्क अस्खलित गुजराती भाषेत बोलायला सुरुवात केली. याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. यावेळी महाराष्ट्रातील राजकारणाचा विषय काढत मोदींना म्हणाल्या, ‘मी आताच गुजरातला जाऊन आले, सुरतमध्येच होते. तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला. पण मला तेव्हा माहित नव्हतं की महाराष्ट्रातील आमदार तिकडे आहेत. हेही वाचा - Supriya Sule In Bus bai Bus: घरात स्वयंपाक करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर, म्हणाल्या… ‘ते रॅडिसन हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती.’ हे ऐकल्यावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. पुढे त्यांनी मोदींजवळ एक खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, ‘अमित शाह रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत.’ असं म्हणत त्यांनी मोदींना संसदेत येऊन त्यांचं भाषण ऐकण्याची विनंती केली.
सुप्रिया सुळे पुढे मोदींबरोबरच्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, ‘आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा ‘मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो. तुम्ही या, पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल.’ अशा प्रकारे सुप्रिया सुळेंनी मोदींसोबत साधलेला हा संवाद प्रेक्षकांना आवडला आहे.