मुंबई, 27 सप्टेंबर : ‘इंडियन आयडॉल’चा तेरावा सिझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. गेल्या दीड दशकांहुन अधिक काळ इंडियन आयडॉल या शोनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. आता शोच्या 13 व्या सिझनसाठी ऑडिशन्स सुरू आहेत. एकीकडे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून दुसरीकडे सोशल मीडियावर या शोच्या बॉयकॉटची मागणी केली जातेय. इंडियन आयडॉल हा शो स्क्रिप्टेड आहे, असा आरोप अनेकदा केला जातो. आता या शोसंदर्भात नवा वाद समोर आला आहे. या शोमध्ये सिलेक्ट झालेल्या स्पर्धकांवरून प्रेक्षकांची काहीशी निराशा झाली आहे. त्यावरून प्रेक्षक हा शो बॉयकॉट होण्याची मागणी होतेय. ‘इंडियन आयडॉल’ च्या या सीझनमध्ये संगीतकार विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया हे परिक्षक आहेत. सध्या या शोच्या फायनल 15 स्पर्धकांची अंतिम यादी समोर आली आहे. त्यामध्ये सोनाक्षी कर, नवदीप वडाली, प्रितम रॉय, देबोस्मिता रॉय, सेंजुती दास, चिराग कोटवाल, यांच्यासह इतर स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे. पण या यादीमध्ये रितो रिबाचे नाव नसल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ऑडिशनच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर या 15 स्पर्धकांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या यादीवर परीक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियाँ यांनी शिक्कामोर्तब केला. त्याचसोबत कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही यादी पोस्ट करण्यात आली. या यादीत रीतो रीबाचं नाव नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे हा शो आता बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. सोशल मीडियावर चाहते आपला राग काढत आहेत. तसेच लोक रिटोला शोमध्ये परत आणण्याची मागणी करत आहेत. हेही वाचा - KBC14: केबीसीच्या मंचावर स्पर्धकाचा संघर्ष ऐकून अमिताभ निःशब्द; शिक्षिकेची केली देवाशी तुलना रीतो हा अरुणाचल प्रदेशचा राहणारा आहे. उत्तम गायक असण्यासोबतच तो संगीतकारसुद्धा आहे. रीतोचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. ऑडिशनदरम्यान परीक्षक हिमेश रेशमियाँने रीतोला स्वत:चं गाणं गाण्यास सांगितलं. तेव्हा रीतोने स्वत: संगीतबद्ध केलेलं गाणं गाऊन दाखवलं. त्याचं हे गाणं प्रेक्षकांनाही खूप आवडलं होतं. पण तरीही त्याचे नाव अंतिम यादीत न आल्याने चाहते दु:खी झाले असून त्यामुळे बहिष्कार टाकण्याची मागणी चाहते करत आहेत.