मुंबई, 7 मे- मराठी चित्रपट आता देश आणि विदेशातील सिनेरसिकांनाही भूरळ घालत आहे. अनेक मराठी चित्रपटांना (marathi film ) अमराठी रसिकही दाद देत आहेत. मराठीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड ( pawankhind ), शेर शिवराज अशा ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटांची मालिका गेल्या काही काळात सुरू केली आहे. या चित्रपटांची लोकप्रियता सातासमुद्रपार पोहोचली आहे. एवढंच नाही तर बॉलीवूड कलाकारही मराठी सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन ( Raveena Tandon ) हिने नुकतेच एक ट्वीट केले असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. यात रविनानं म्हटलंय की, “नुकताच पावनखिंड सिनेमा पाहिला. खूप खूप आवडला. (Just watched “pawankhind” just loved loved loved it.)” पावनखिंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला खूप मोठी लोकप्रियता मिळाली होती. बाजीप्रभू देशपांडेंचा भीम पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेरसिकांची पाऊले आपसुकच सिनेमागृहांकडे वळली होती. त्यामुळेच अद्यापही ‘पावनखिंड’चे गारुड रसिकांवर कायम आहे.
Just watched “pawankhind” just loved loved loved it. ♥️
— Raveena Tandon (@TandonRaveena) May 7, 2022
दरम्यान, मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनखिंड मोहिमेवर आधारित पावनखिंड हा चित्रपट आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्ददर्शन केले आहे. मातोश्री जिजाऊसाहेब यांची भूमिका अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अजय पूरकर असून त्यांचा अभिनय लाजवाब आहे. सिद्दी जौहरची भूमिका समीर धर्माधिकारी यांनी उत्तम वठवली आहे. तर आस्ताद काळे, प्राजक्ता माळी यांच्या छोट्या भूमिकाही लक्षात राहणाऱ्या आहेत. वाचा- संजनानं मालिकेतून घेतला ब्रेक, खास मंडळींसोबत घेतेय कोकण ट्रीपचा आनंद सध्या मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखवतात. शिवाय अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमाचं कौतुक करताना दिसतात. मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक देखील नुकताच आला होता.