दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल 2020 (IPL 2020) चा प्रत्येक सामना सध्या रंगात आला आहे. फॅन्स देखील यावर्षीचा हंगाम एन्जॉय करताना दिसत आहेत. दरम्यान कोरोनामुळे आधीच लांबलेला हंगाम भारतात न होता युएईमध्ये सुरू आहे. कोरोनाकाळा टूर्नामेंट भरवताना विशेष खबरदारी घ्यावी लागते आहे. दरम्यान याठिकाणी कशी काळजी घेतली जात आहे याबाबत किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) स्वत: खुलासा केला आहे. प्रीती झिंटाने बायो बबल (Bio Bubble) मध्ये कसं आयुष्य असतं याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर तिने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 20 वेळा तिची कोरोना टेस्ट झाली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने स्वत:ला कोरोना टेस्ट (Corona Test)क्वीन म्हटले आहे. प्रीती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रीती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. प्रीतीबरोबर या व्हिडीओमध्ये पीपीई किट परिधान केलेली मेडिकल स्टाफमधील एक महिला आहे, जी प्रीतीची टेस्ट करत आहे. दरम्यान टेस्ट केल्यानंतर प्रीती असं म्हणते की, या महिला कोरोना टेस्ट करण्यासाठी बेस्ट आहेत कारण त्या खूप गांभीर्याने हे काम करत आहेत.
या व्हिडीओला कॅप्शन देताना प्रीतीने आयपीएल बायो बबलमध्ये नेमकं कसं राहावं लागतं याबाबत भाष्य केलं आहे. तिने असं म्हटलं आहे की, ‘मला अनेकांनी विचारलं की आयपीएल बायो बबलमध्ये राहणं कसं असतं. तर याची सुरुवात 6 दिवसांच्या क्वारंटाइनने होते, दर दिवशी 3-4 वेळा कोव्हिड टेस्ट होते आणि या दिवसात बाहेर जाता येत नाही. केवळ तुमची रुम, किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी असलेले हॉटेल आणि जिम त्याचप्रमाणे कारमध्ये स्टेडियम. ड्रायव्हर्स आणि शेफ देखील बायोबलमध्ये आणि क्वारंटाइन असतात, त्यामुळे बाहेरचे खाणे नाही किंवा इतर लोकांशी कोणतेही संभाषण नाही. तुम्ही माझ्यासारखे फ्री बर्ड असाल तर हे खूप कठीण आहे, पण हे 2020 आहे. पँडेमिकदरम्यान आयपीएल होत आहे, हेच कौतुकास्पद आहे. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी बीसीसीआय, KXIP आणि सोफिटेल दुबई द पामचा चा स्टाफ यांचे मी आभार मानायलाच हवे.’