मुंबई, 5 जुलै: अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अचानकच हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने मंदिरा बेदीला प्रचंड धक्का बसला होता. आता राज यांच्या निधनानंतर सहा दिवसांनी मंदिराने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे.
मंदिरा बेदीने राज यांच्याबरोबरचा एक आनंदी क्षण शेअर करून सोबत लाल बदाम तुटल्याचं इमोजी शेअर केलं आहे. तिच्या या एका इमोजीने व्यक्त होण्याचीही सोशल मीडियाने त्वरित दखल घेतली. अनेक सेलेब्रिटींनी मंदिराच्या या Instagram Post वर प्रतिक्रिया देत तिला धीर दिला आहे. साइन नेहवाल, हरभजन सिंग, अमृता सुभाष, अधुना, मिथिला पालकर, अरमान मलिक या सेलेब्रिटींनी काही क्षणातच मंदिराच्या पोस्टला रिप्लाय केले आहेत.
राज कौशल यांच्या निधनामुळे केवळ त्यांचे कुटुंबीयच नाहीत तर मनोरंजनविश्वच दु:खात आहे. राज यांच्या अंत्यसंस्कारावेळी चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. मंदिराने साश्रू नयनांनी अंत्य संस्कार पार पाडले. आता राज यांचा मित्र आणि संगीतकार सुलेमान मर्चंट
(Suleman Merchant) यांनी आता एक खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'मंगळवारी संध्याकाळीच राज यांना छातीत दुखत होतं त्यांनी मंदिराला सांगितलं होतं की मला छातीत दुखतंय पण त्यांना मंदिरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तोपर्यंत फार उशीर झाला होता.' ई टाइम्सशी बोलताना सुलेमान यांनी ही माहिती दिली आहे.
30 व्या वर्षी आला होता पहिला हार्ट अटॅक
राज यांना मंगळवारी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत असल्याची माहिती सुलेमान यांनी दिली. ते म्हणाले की, 'छातीत दुखतंय म्हणून त्यांनी अँटॅसिड टॅब्लेट (Antacid Tablet) घेतली. बुधवारी पहाट 4 वाजता राजनी मंदिराला सांगितलं की त्याला हार्ट अटॅक येतो आहे. मंदिराने तातडीने त्यांचा मित्र आशीष चौधरीला फोन केला आणि ते दोघं राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला लागले पण राजची शुद्ध हरपली होती. त्यांनी राजला हॉस्पिटलमध्ये नेलं पण 5-10 मिनिटांत त्यांच्या लक्षात आलं की राजची नाडी चालू नव्हती. डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. या आधीही राज 30-32 वर्षांचे असताना त्याला हार्ट अटॅक आला होता पण त्यानंतर त्यानी स्वत: ची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली होती. आता त्याची तब्येत खूप सुधारली होती.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.