मुंबई, 05 मार्च: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) अल्पावधीतच एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. असंख्य चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडं चाहत्याचं लक्ष असतं. जान्हवी सध्या चित्रपटांमध्ये चांगलं काम करीत आहे, बॉलिवूडमधील तिचं फिल्मी करिअर रूळावर येताना दिसत आहे. अलीकडेच जान्हवी कपूरला लग्नाबाबत (Janhavi Kapoor marriage Plan) विचारलं असता, तिने अतिशय रंजक उत्तर दिलं आहे. जान्हवीला साधेपणा आवडतो, त्यामुळे तिही अगदी साधेपणाने लग्न करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. तिला खूप लवाजमा पद्धतीनं लग्न करायचं नाही, असं तिने सांगितलं आहे. तिला तिरुपती याठिकाणी अगदी सोप्या पद्धतीनं लग्न करायचं आहे. एका मुलाखतीदरम्यान, जान्हवीला विचारण्यात आलं होतं की, लग्नाबाबत काय प्लॅन आहे? यावर अभिनेत्रीने अनोखं उत्तर दिलं आहे. यावेळी तिने सांगितलं की, ‘सुरुवातीपासूनच लग्नाबाबत माझ्या मनात एक चित्र स्पष्ट आहे. मी तिरुपतीमध्ये लग्न करेल आणि माझ्या लग्नात कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील. मला माहित आहे की, मी सोनं, कांजीवरम साडी परिधान करेल आणि माझ्या केसांमध्ये खूर सारे मोगऱ्याची फुलं लावली असतील. माझा पती लुंगीमध्ये असेल आणि आम्ही केळीच्या पानांवर जेवण करू. ’ इतक्या साध्या पद्धतीनं लग्न का करायचं आहे? असं विचारलं असता जान्हवी म्हणाली की, ‘मी बर्याच वेळा तिरुपतीला गेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणीच मी माझ्या प्रियकरासोबत विवाहबंधनात अडकावं अशी माझी इच्छा आहे. मला लवाजमा असणारी लग्न फारशी आवडत नाहीत. एखाद्या मोठ्या लग्नात नक्कीच मजा येते, परंतु जेव्हा अशा मोठ्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष तुमच्याकडं असतं, तेव्हा आतून घाबरल्यासारखं होतं.’ हे ही वाचा - जान्हवीचा पहिलाच आयटम साँग पाहून प्रेक्षक झाले अवाक; तुम्हाला कसा वाटतोय पाहा जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला होता. यामध्ये ती पंजाबी पेहरावात दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ सेन करत आहेत. तर या चित्रपटाची कथा पंकज मत्ता यांनी लिहिली आहे. याशिवाय जान्हवी ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातही दिसणार आहे. तसेच लवकरच जान्हवी ‘रुही’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.