मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा मुंडे यांची कार्यक्रमात वर्णी लागली आहे. बस बाई बस कार्यक्रमाला अल्पावधीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या आठवड्याचा भाग पंकजा मुंडे यांच्या बेधडक बिनधास्त प्रश्न उत्तरांनी खुलून आला आहे. अभिनेता प्रसाद ओक कार्यक्रमाचा सूत्रधार आहे. प्रसाद त्याच्या शैलीनं येणाऱ्या पाहुण्यांनं बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी सुबोधच्या प्रश्नांना पंकजा मुंडेंनी उत्तर दिली खरी मात्र कार्यक्रमाच्या मध्यावर वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाहून पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बस बाई बस कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्याला कार्यक्रमात एक फोटो दाखवून त्याच्याशी संवाद साधायला सांगितलं जातं. फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीशी मनात असलेली भावना बोलून दाखवायची असते. या खेळात पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील आणि राजकीय नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटो दाखवण्यात आला. वडीलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक झाल्या. हेही वाचा - Pankaja Munde: दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? पंकजा मुंडेंनी दिलं बेधडक उत्तर
गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांना सुबोध भावेनं ‘तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला’, असं म्हटलं. त्यावर पंकजा ताई म्हणाल्या, ‘मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला इतक्या लवकर आम्हाला असं अर्ध्यावर टाकून जायला नको होतं’. उत्तर देत पंकजा मुंडेना अश्रू अनावर झाले. दरम्यान बस बाई बसच्या भागात पंकजा मुंडेंना अनेक राजकीय तसेच वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. कधी विरोधी पक्षाचे आमदार फोडले आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडेंनी क्षणाचा विलंब न करता हो असं उत्तर दिलं. त्यावर स्पष्टीकरण देत पंकजा ताईंनी विनोदनिर्मितीही केली. सध्या बस बाई बसचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.