मुंबई, 11 ऑगस्ट : झी मराठीवर नव्या सुरू झालेल्या बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात दर आठवड्यात नवा प्रवासी सहभागी होत आहे. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक स्त्री व्यक्तिमत्त्व कार्यक्रमात सहभागी झालं आहे ज्या आहेत भाजप नेत्या पंकजा मुंडे. बस बाई बसच्या उद्याच्या म्हणजेच 12 ऑगस्टच्या भागात पंकजा मुंडे सहभागी होणार आहे. कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची पंकजा ताईंनी बेधडक उत्तर दिली आहेत. कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून पंकजा मुंडेंना विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तर ऐकण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी बस बाई बसच्या प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन पकंजा ताईंना प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर त्यांना हो की नाही अशा स्वरुपात द्यायचं होतं. सुबोध भावेनं पंकजा ताईंना ‘दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता पंकजा ताईंनी ‘हो’ असं उत्तर दिलं. पंकजा ताईंच्या उत्तरावर एकच हशा पिकला. हेही वाचा - VIDEO: ‘एक आमदार की किमत…’; बस बाई बसच्या मंचावर पंकजा मुंडेचा अनोखा अंदाज त्यानंतर ‘कोण कोण आणि कधी?’, असा प्रश्न विचारल्यावर पंकजा ताईंनी धडक उत्तर देत म्हटलं, ‘कोण कधी हे सांगितलं तर आता एक तास आणखी एपिसोड घ्यावा लागेल. पण अनेक लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या जिल्ह्यामध्येही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय’.
पंकजा ताईंनी पुढे उत्तर देत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शिकवणूकीची आठवण करुन दिली त्या म्हणाल्या, ‘राजकारणात आज मी ज्या पोझिशनवर काम करतेय तिथे बाबांनी मला एक वाक्य नेहमी सांगितलं की, नेहमी बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे आपल्याकडे बेरीज होत असेल आणि राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्त्वाचं असतं त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला शोभेल अशी लोक घेण्याचा मी तरी प्रयत्न करते’. पंकजा ताईंनी पुढे त्यांच्या पक्षात आलेल्या काही नेत्यांची नावं सांगत विनोदनिर्मिती केली. त्या म्हणाल्या, ‘मी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नमिता मुंदळे यांना माझ्याकडे घेऊन आमदार केलं आहे. सुरेश धस राष्ट्रवादीमधून आले त्यांना घेतलं आहे. असं आमच्याकडे सातत्यानं इंम्पोर्ट एक्सपोर्ट सुरूच असतं’. पंकजा ताईंनी दिलेल्या या बेधडक उत्तरांमुळे बस बाई बसचा येणारा एपिसोड पोहण्याची उत्सुकता वाढली आहे.