मुंबई, 01 जानेवारी: सोशल मीडिया इन्स्फ्ल्युएन्सर आणि आपल्या विचित्र फॅशन स्टाइलनं कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेद नं वर्षभर तिच्या चित्र विचित्र कपड्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी तिच्यावर टीका केली मात्र तिने काही आपलं वागणं सोडलं नाही. काल उर्फीच्या विचित्र कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. ट्विट करत त्यांनी उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर उर्फीनेही त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता उर्फीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ नेहमीच महिलांच्या प्रश्नांवर आपली मतं मांडत आली आहेत. मुंबईत महिलांवर होणारे अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणिती असोत त्या नेहमी आपली परखड मत मांडत असतात. एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे सोशल मीडियावर बिनधास्त कपड्यांचा बाजार मांडणाऱ्या उर्फीवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉसमधून बाहेर पडताच विकास मानकतलाचे स्पर्धकांवर गंभीर आरोप; म्हणाला ‘त्यांचं तोंडदेखील… भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतंच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चित्र विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्रही दिलं आहे. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे.
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB
या ट्विट मध्ये चित्रा वाघ म्हणतायत कि, ‘‘मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली’’ चित्रा वाघ यांनी आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलंय कि,‘उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.’
‘मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”, असे चित्रा वाघ यांनी या पत्रात म्हटले आहे.