मुंबई, 15 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी चा चौथा सीझन सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दुसरा आठवडा सुरू असून स्पर्धक गेली दहा दिवस एकत्र घरात राहत आहेत. दहा दिवसात स्पर्धकांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली आहे. स्पर्धक एकमेकांचे मित्र होऊ लागलेत, एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी, शेअरिंग सुरू झाली आहे. स्पर्धक जितके एकमेकांबरोबर भांडत असतात तितकेच ते एकमेकांशी गप्पा, मजा, मस्ती करत असतात. आता प्रेक्षकांना आतुरता असते ती महेश सरांच्या आठवड्याच्या चावडीची. या चावडीमध्ये स्पर्धकांनी आठवडाभर केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची शाळा घेतल्याचं पहायला मिळतं. अशातच दुसऱ्या चावडीचा प्रोमो समोर आला आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवरुन पहायला मिळतंय की महेश सर आठवड्याभरात झालेल्या सगळ्या गोष्टीवर स्पर्धकांना वठणीवर आणण्याचं काम करणार आहे. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये महेश सर आता या आठवड्याचा कॅप्टन रोहित शिंदेची शाळा घेणार आहेत. महेश सरानी रोहितला कृतघ्न म्हटलं आहे. हेही वाचा - BBM4: महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांना आणणार वठणीवर, बिग बॉसच्या चावडीवर काय घडणार? प्रोमोमध्ये महेश सर रोहितला ‘तू कॅप्टन कोणामुळे झालास’ असं विचारतात. त्यावर रोहित योगेश आणि विकास असं उत्तर देतो. पण त्यानंतर मात्र महेश सर चांगलंच चिडतात. ते म्हणतात कि, ‘‘ज्यांच्यामुळे कॅप्टन झालास त्यालाच विसरलास. तुला कॅप्टन बनवण्यासाठी हा विकास राबला, पण तू त्याला पाणीसुद्धा विचारलं नाहीस.’’ ते पुढे रोहितला ‘किती कृतघ्न आहेस तू’ असं देखील म्हणतात. महेश सरांचं बोलणं ऐकून विकासाला मात्र चांगलाच आनंद होतो. रोहितची चूक दाखवून दिल्याबद्दल तो महेश सरांचे आभार देखील मानतो.
मागच्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली. तरीही या आठ्वड्यात सुद्धा तिचा आवाज काही कमी नाही. या आठ्वड्यात देखील तिने किरण माने,विकास सावंत यांच्यावर आवाज चढवला. त्यामुळे महेश सर यावर काय शाळा करणार हे पाहणंही उत्सुकतेचं असणार आहे. अपूर्वाशिवाय अनेक स्पर्धकांना महेश सरांनी मागच्या चावडीत झापलं होतं. आता या आठवड्याच्या चावडीवर सुद्धा तिची खरडपट्टी काढणार आहेत.
बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी घराची कॅप्टन झाली होती. तर या आठवड्यात रोहित शिंदे घराचा दुसरा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे या चावडीत महेश सरांच्या तावडीत कोण कोण स्पर्धक सापडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.