मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे. याच संत परंपरेमधील एक महत्वाचं नाव म्हणजे संत बाळूमामा. अक्कोळ गावच्या बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. याच बाळूमामांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारी ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. कलर्स मराठीवर ही मालिका मागील चार ते पाच वर्षांपासून सुरु असून आजही त्या मालिकेला लोक तितकेच आवडीने बघतात. या मालिकेद्वारे बाळुमामाच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांनी केलेले चमत्कार दाखवले आहेत. लवकरच या मालिकेत नवीन वळण येणार आहे. येत्या रविवारी या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये एका गावच्या पाटलाने बाळूमामांनाच आव्हान दिले आहे. पण मामा देखील त्याला जशाच तसे उत्तर देणार आहेत. बाळूमामा मेंढ्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावात प्रवास करत असतात. अशाच एका गावात सध्या बाळूमामांचा मुक्काम आहे. पण तेथील पाटलाचा बाळूमामांना विरोध आहे. त्यानेच बाळूमामांना आव्हान दिले आहे.
तो पाटील मामांना म्हणतो, ‘तुझ्यासारखे देवऋषी खूप बघितलेत. मी तुला या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही.’ पण त्याचा अहंकारच त्याचा घात करणार आहे. कारण आता बाळूमामांनी त्याला ‘सहा महिन्यात तुझा जीव जाईल’ असा शाप दिला आहे. बाळूमामा त्याला म्हणतात, ‘सहा महिन्यात तू जमिनीवर येशील, पाणी पाणी करून तुझा जीव जाईल.’ हेही वाचा - Ajay-Atul : रिऍलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं?; अजय अतुल यांनी दिलं उत्तर! त्यामुळे आता बाळूमामांचे बोल खरे ठरणार का, तो व्यक्ती अहंकार बाजूला ठेवून बाळूमामांना शरण जाईल का, कि बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये समजेल. व्यक्तीच्या अहंकरापुढे दैवी सामर्थ्य किती मोठे आहे हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेद्वारे बाळूमामांचं कार्य महाराष्ट्र्भर पोहचवल गेलं. बाळूमामांचा महिमा या मालिकेतून दाखवला आहे. या बाळूमामांच्या आयुष्यातही अनेक संकटं आली पण त्यांनी त्यावर मात करत भक्तांसमोर आदर्श घालून दिला. बाळूमामांना अनेकांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागला पण हेच विरोधक पुढे त्यांचे भक्त झाले.