मुंबई, 11 मार्च: 'बहु हमारी रजनीकांत' मालिकेतून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजे रिधिमा पंडित. या मालिकेत तिने सुपर ह्युमनॉइड रोबोट असलेली सून असं आगळंवेगळी भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने सगळ्यांचीच वाहवा मिळवली होती. तसंच या अभिनेत्रीने बिग बॉस मध्ये देखी धुमाकूळ घातला होता. बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये रिधिमा वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचं बोललं गेलं पण तसं झालं नाही. आता मात्र ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिधिमा पंडित हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
रिधिमा पंडित सध्या 32 वर्षांची असून वयाच्या या टप्प्यात तिने आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नुकतंच तिने आपलं बीजांड गोठवले असल्याचा खुलासा केला आहे. रिधिमा पंडितने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिची बीजांड गोठवली होती. याविषयी बोलताना तिने तिला तिच्या निर्णयाचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. तसंच तिने एवढा मोठा निर्णय का घेतला ते हि अभिनेत्रीने सांगितलं आहे.
याविषयी बोलताना रिधिमा म्हणाली, 'गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी Eggs Freeze करून घेतले. तेव्हा पासून मला स्वतंत्र वाटत आहे. अनेक दिवसांपासून मी या गोष्टीचा विचार करत होते. 2022 च्या सप्टेंबरमध्ये मी बीजांड गोठवून घेतली. पुढच्या प्रोजेक्टसाठी मधल्या एक महिन्याचा वेळ होता. त्यादरम्यान मी ही प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेत मी उत्तम डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतलं.' रिधिमाच्या कुटुंबियांकडूनही यासाठी पाठींबा मिळाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. विशेषतः तिच्या दिवंगत आईने तिला यासाठी पाठींबा दिल्याचं ती म्हणाली. ती म्हणाली, 'माझे कुटुंबीय खूप आधुनिक विचारांचे आहेत. खासकरुन माझी आई. याबाबात मी कुटुंबियांबरोबर चर्चा केली. मला उद्या लग्न करावसं वाटलं नाही, चांगला मुलगा मिळाला नाही आणि करिअर फोकस करण्याचं ठरवलं पण तरीही आई होण्याची इच्छा झाल्यास मी आधीच याची तयारी करत आहे, असं मी म्हणाले. यावर माझ्या आईने नक्की विचार कर, असा सल्ला दिला.'
View this post on Instagram
लग्न आणि मातृत्वापेक्षा करिअर आणि जीवनशैलीला प्राधान्य देणारे लोक अशी पावले उचलतात, असे अनेकांचे मत आहे. तिशीत असलेली रिधिमा म्हणते, 'एक स्त्री मातृत्व आणि काम कसे सांभाळेल हे प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतात, परंतु कोणीही पुरुषाला याबद्दल विचारत नाही. व्यवसाय कोणताही असला तरीही लोक महत्त्वाकांक्षी असतात, म्हणून अभिनेत्रींना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आणि आई होण्यास उशीर केल्याबद्दल दोष देऊ नये.'
अभिनेत्री म्हणते की तिचे बीजांड गोठवण्याचा अर्थ असा नाही की तिला लग्न करायचं नाही. ती म्हणते, 'मला अजून कोणीही जोडीदार सापडलेला नाही. महिलांसाठी आई होण्याचा एक विशिष्ट वय असतं, म्हणूनच हा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे आता मला लग्न करण्याचाही ताण असणार नाही. या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या व्हाव्या, असं मला वाटतं. पण तसं नाही झालं, तरी भविष्यात मला खंत वाटणार नाही' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress, Tv serial