मुंबई 25 जुलै: अतुल कुलकर्णी यांच्या अभिनय कौशल्यावर अख्खा देश फिदा आहे यामध्ये वाद नाहीच. पण अतुल येत्या काळात लेखनासारखी मोठी जबाबदारी पेलताना दिसणार आहे. अतुल आणि आमिर खान हे समीकरण ‘रंग दे बसंती’ सिनेमापासून प्रेक्षकांना माहित आहे. जवळपास पंधरा वर्षांहून अधिक काळ ओळख असतानाही अतुल यांनी लिहिलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या संहितेचं वाचन करायला आमिर याने नकार दिला होता असं अतुल News18 लोकमतशी संवाद साधताना सांगतात. अतुल कुलकर्णी आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (atul kulkarni aamir khan) या जोडीचे ऋणानुबंध आजही तसेच आहेत असं अतुल या मुलाखतीच्या निमित्ताने सांगतात. ते म्हणतात, “आमिर आणि मी एकमेकांना जवळपास सतरा वर्ष ओळखतो. आमचे संबंध एवढे टिकले याचं कारण आहे आमचे विचार कायम एकमेकांशी पटत आले आहेत. तरीही आमिरने मी लिहिलेली स्क्रिप्ट ऐकायला नकार दिला होता. जवळपास दोन वर्ष त्याने स्क्रिप्ट ऐकायला घेतली. मी त्याला विचारल्यावर त्याने मला खरं कारण सांगितलं. तो मला म्हणाला की खरं सांगायचं तर मला विश्वास बसत नाहीये की तू अगदी बारा-पंधरा दिवसात फॉरेस्ट गम्प सारख्या सिनेमाचं भारतीयकरण करून संहिता लिहिली आहेस. त्यात तू याआधी काहीच लिहिलेलं नसताना मला असं वाटतंय की मला कदाचित ही संहिता आवडणार नाही आणि तस झालं तर मला तुझ्याशी खोटं बोलता येणार नाही. त्यामुळे तू सुद्धा दुखावला जाशील. पण त्याला मी समजावलं आणि तो संहिता ऐकायला तयार झाला. आणि अर्थातच त्यानंतर त्याला संहिता खूप आवडली आणि त्याने यावर काम करायचं निश्चित केलं.”
नटरंग, प्रेमाची गोष्ट अशा सिनेमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवलेला अभिनेता अतुल कुलकर्णी हा येत्या काळात ‘लाल सिंग चढ्ढा’ सिनेमातून लेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अतुल आणि आमिर यांचं वेगळं समीकरण बघायला मिळणार आहे. हे ही वाचा- Katrina Kaif: कतरीनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं काम वेगाने सुरु, साऊथ अभिनेत्यासह करणार धिंगाणा लाल सिंग चढ्ढा हा हॉलिवूड सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ चा भारतीय रिमेक आहे. सध्या या सिनेमाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. सिनेमाच्या अनेक पैलूंनी सिनेमाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. फॉरेस्ट गम्पसारखी एक प्रभावी कथा भारतीय रूपात कशी दिसेल हे बघायची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये सुद्धा असल्याचं दिसत आहे. या सिनेमात आमिर खान सह मोना सिंग, करीना कपूर असे अनेक कलाकार दिसून येणार आहेत.

)







