मुंबई, 14 जानेवारी : ‘कमला’, ‘मोलकरीण बाई’ सारख्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी कासार मागचे काही दिवस टेलिव्हिजनपासून दूर आहे. टेलिव्हिजनपासून दूर असली तरी अश्विनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ‘माणीळ एक गाव’ या सिनेमानंतर नव्या वर्षात अश्विनीचा ‘पिकोलो’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सिनेमाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित करण्यात आला. राज ठाकरे यांनी सिनेमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. ‘पिकोलो’ सिनेमात संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट पाहायला मिळणार आहे. सिनेमात अश्विनी कासारबरोबर अभिनेता प्रणव रावराणे प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे अभिनेते किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्याही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. हेही वाचा - Manasi Naik: काळी साडी चंदेरी काठ! मकरसंक्रातीला मानसीचा मराठमोळा थाट
संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ सिनेमात पहाणं रंजक ठरणार आहे.
चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार यांनी केलं आहे तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत.