मुंबई, 26 जुलै: छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेते अरविंद धनू यांचं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मुंबई येथील एका कार्यक्रमात ते सहभागी झाले असता अरविंद यांचं ब्लड प्रेशर वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना ब्रेन स्टोकचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं. अरविंद धनू यांच्या निधनानं मराठी टेलिव्हिजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अरविंद धनू यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी आणि मित्रपरिवार आहे. त्यांच्यावर काल रात्री मुंबईच्या माहीम येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेते अरविंद धनू यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून ते प्रसिद्धीझोतात आले होते. मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांच्या भूमिका साकारली होती. राजकारणी असलेल्या शालिनीच्या वडिलांची भूमिका अरविंद यांनी उत्तमरित्या निभावली होती. मालिकेत त्यांची एंट्री फार कमी वेळा दाखवण्यात आली पण शालिनीचे डॅशिंग वडिल म्हणून ते कायम लक्षात राहिले.
हेही वाचा - Timepass 3: भाईलोकांचा भाई अन् पालवीचा फफ्फा; संजय नार्वेकरची खतरनाक भूमिका अरविंद धनू यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आधी ‘लेक माझी लाडकी’, ‘क्राईम पेट्रोल’ सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच अरविंद यांनी ‘एक होता वाल्या’ या नाटकातही काम केलं होतं. अरविंद यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांबरोबर सेटवर काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही दिवसांआधीच ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील मलखान म्हणजे अभिनेते दीपेश भान यांच अकाली निधन झालं. त्यांच्या जाण्यानं हिंदी टेलिव्हिनजनवरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या दु:खातून छोट्या पडद्यावरील कलाकार बाहेर येत नाहीत तर आज अभिनेते अरविंद धनू यांचं निधन झालं .