मुंबई, 27 सप्टेंबर : नेहमी खळखळून आणि मनसोक्त हसणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरन सिंग. त्यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील मिस ब्रागांझा ही व्यक्तिरेखा प्रेक्षक अजूनही विसरू शकलेले नाहीत. विनोदी भूमिका आणि हास्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह हिने 100 हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण नेहमी हसणाऱ्या अर्चना सिंग यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. नुकत्याच त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. अर्चना पूरन ने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिच्या विनोदी भूमिकांबद्दल सांगितले . त्या म्हणाल्या कि, “माझ्या भूमिकांची छापच एकदम पक्की होती. म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटातील मिस ब्रिगेंझाच्या भूमिकेनंतर मला कोणती ऑफर द्यावी हे लोकांना कळतच नव्हतं. तो चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 25 वर्षे झाली आहेत. पण आजही ती भूमिका माझी पाठ सोडत नाही.” हेही वाचा - Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; ‘हे’ आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद अर्चना पूरनने कबूल केले की लोकांमध्ये असा समज आहे की ती फक्त विनोदी भूमिकाच करू शकते. यावेळी त्या म्हणाल्या, “मी फक्त कॉमेडीच खूप चांगलं करू शकते, असं लोकांना वाटतं. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला चांगल्या कामाला मुकल्यासारखं, फसवणूक झाल्यासारखं वाटतं. चांगल्या भूमिकांसाठी मी अक्षरश: तडफडतेय”, अशी खंत तिने व्यक्त केली.
“जर तुम्हाला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या, तर तुम्ही खूप नशिबवान आहात असं अनेकजण म्हणतात. लोकांना तुम्हाला सतत पाहण्याची इच्छा असते, असं ते सांगतात. पण माझ्या मते, तो एका अभिनेत्याचा मृत्यूच आहे. मला आठवतंय, एकदा नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली होती. मीसुद्धा या संधीचा उपयोग त्यासाठी करू इच्छिते. दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे मी कामाची मागणी करते”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
अर्चना यांनी पुढे सांगितलं की त्या वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत लोकांनी त्यांची एकच बाजू पाहिली आहे पण त्या कॉमेडीशिवाय इतर अनेक प्रकारची पात्रे साकारू शकतात हे त्यांना लोकांना दाखवून द्यायचं आहे. त्या म्हणाल्या कि, “एक कलाकार म्हणून मी परफॉर्म करण्यासाठी तडफडतेय. कॉमेडीशिवाय मी बरंच काही करू शकते. मी रडूही शकते, लोकांना रडवूही शकते. माझ्या कलेची ती बाजू लोकांसमोर आलीच नाही. पण मला आशा आहे की एक दिवस ते नक्कीच लोकांसमोर येईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.