मुंबई, 30 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिच्याविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या प्रत्येक कंटेन्टच्या कॉपीराईटची मालकीण आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर तिला त्याचा स्वतंत्र परतावा मिळतो. मग तिच्या एखाद्या डान्सच्या सीनची झलक जाहिरातीत जरी वापरली गेली तरी त्याचा मोबदला तिला दिला जातो. या प्रत्येक मिळकतीवर तिनं कर भरण आवश्यक आहे. त्यामुळे विक्रीकर विभागाविरोधात अनुष्कानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळून लावण्याची मागणी विभागातर्फे करण्यात आली आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत माझगाव विभागीय आयुक्तांनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलंय. यातील एका याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तर दुस-या याचिकेवर आज, गुरूवारी हायकोर्टात सकाळच्या सत्रात सुनावणी होणार आहे.
पत्रकारासोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमान विषयी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण ?
अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही ?, एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही.असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत ती याचिका निकाली काढली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिनेत्री अनुष्का शर्माला विक्रीकर विभागानं नोटीस बजावली आहे. अनुष्कानं एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिकरित्या तिच्या उत्पादनांची जाहिरातबाजी झालेली आहे, असा ठपका विक्रीकर विभागानं ठेवला आहे. यासंबंधी साल 2012-13 साठी 12.3 कोटींच्या उत्पनावर 1.2 कोटी तर साल 2013-14 साठी 17 कोटींच्या उत्पनावर 1.6 कोटी रुपये कर थकबाकी दाखवली आहे. ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली आहे. या नोटीसीला अनुष्कानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. याप्रकरणी अनुष्कापुढे अपिलीय लवादापुढे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत राज्य सरकारनं या याचिकेला विरोध केला होता. मात्र जर आम्ही ते अपील केलं तर आम्हाला त्यापूर्वी करातील 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल असा दावा अनुष्काच्यावतीनं करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma