मुंबई, 09 डिसेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील एका चित्रपटाने अमराठी प्रेक्षकांनाही वेड लावलं. हा चित्रपट म्हणजे सैराट. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील कलाकारांना प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली. आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसून येते. अशातच आता बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटाविषयी मोठं विधान केलं आहे. त्याचबरोबर त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंवरही निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्याने पॅन-इंडियन हिट्सच्या निर्मितीच्या ट्रेंडवरही भाष्य केलं आहे. त्याचं हे विधान आता चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकत्याच झालेल्या ‘Galatta Plus’ मधील संवादात अनुराग कश्यपने विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी सैराटविषयी बोलताना तो म्हणाला कि, ''मी नागराजशी बोललो. मी त्याला म्हणालो 'सैराटने मराठी सिनेमा उद्ध्वस्त केला हे तुला माहीत आहे का?' म्हणजे सैराटचे यश. खूप पैसा कमावता येतो हे त्याच्याकडून लोकांना कळले. अचानक उमेश कुलकर्णी आणि इतरांनी आपापल्या प्रकारचे चित्रपट बनवणे बंद केले. कारण त्या सगळ्या लोकांना 'सैराट' कॉपी करायची होती. '' असं अनुराग म्हणाला आहे.
हेही वाचा - Katrina Kaif and Vicky Kaushal: विकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर कतरिनाला पडला होता 'हा' प्रश्न
या वर्षात बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाने जादू केली तो म्हणजे ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा'. या चित्रपटाने भल्याभल्यांना वेड लावले. सगळ्या स्तरावर चित्रपटाचे कौतुक झाले. त्यानंतर आता बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मात्र ऋषभ शेट्टीला एक वेगळाच सल्ला दिला आहे. ऋषभ शेट्टीला सल्ला देत अनुराग म्हणाला कि, "जर ऋषभ शेट्टीने या यशानंतर त्याच्या चित्रपटसृष्टीत मूलभूत बदल केला तर. आणि बॉक्स ऑफिसवर लक्ष ठेवून त्यांनी बिग बजेट चित्रपट बनवायला सुरुवात केली तर ते योग्य ठरणार नाही. कारण चित्रपट बनवण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्वीसारखाच असायला हवा.''
याचबरोबर सध्या सुरु असलेल्या पॅन -इंडिया चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडविषयी तो पुढे म्हणाला, “आता प्रत्येकजण पॅन-इंडिया चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या चित्रपटांपैकी फक्त ५% किंवा १०% चित्रपटांना यश येतं. ‘कांतारा’ किंवा ‘पुष्पा’सारखा चित्रपट तुम्हाला बाहेर जाऊन तुमची कहाणी सांगण्याचे धाडस देतो, पण ‘KGF 2’ ला कितीही मोठे यश मिळाले तरी तुम्ही प्रयत्न करून, भरमसाठ खर्च करून जेव्हा तसा प्रकल्प उभारता, तेव्हा तो आपत्तीच्या दिशेनं जाऊ लागतो. हा एक बँडवॅगन आहे, ज्याच्या माध्यमातून बॉलिवूडने स्वतःचा नाश केला.''
आता अनुराग कश्यपच्या या विधानांची जोरदार चर्चा होताना दिसून येतेय. काही जण त्याच्या मतांचं समर्थन करतायत तर काही जण विरोध करतानाही दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.