मुंबई, 21 मे: अनुराधा पौडवाल या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय गायिका आहेत. त्यांनी हिंदी गाण्यांपासून ते देवी-देवतांच्या भजनांपर्यंत एकाहून एक अप्रतिम गाणी गायली आहेत. पण सध्याच्या काळात अनेक जुन्या गाण्यांचं रिमिक्स केलेलं आपण पाहतो. ही नवी तयार केलेली गाणी ऐकून अनेकदा जुन्या ओरिजनल गायकांचा संताप होतो. असंच अनुराधा पौडवाल यांना देखील त्यांच्या गाण्याचे रिमिक्स केलेले आवडत नाहीत. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अनुराधा यांनी अरिजित सिंगच्या ‘आज फिर तुम पे’ या रिक्रिएशनचं उदाहरण देत सांगितले होते की, ते गाणं ऐकून त्यांना रडू आलं.’ त्यांनी केलेल्या या वक्तव्याची खूपच चर्चा झाली. त्यांनी आता या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाल्या होत्या अनुराधा पौडवाल? ‘आज फिर तुम पे’च्या रिमिक्सवर अनुराधा पौडवाल म्हणाल्या होत्या, “जेव्हा कोणीतरी मला दयावानमधील ‘आज फिर तुम पे’चे हे रिमिक्स ऐकायला सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने मला ते एक सुपर - डुपर हिट गाणे असल्याचं सांगितलं आणि मला ऐकायला लावलं. ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी लगेच YouTube वर गेलो आणि चित्रपटातील माझे मूळ गाणे अनेक वेळा ऐकले, नंतर माझे मन शांत झाले.’’ अनुराधा यांच्या या वक्तव्याची सगळीकडे खूपच चर्चा झाली.
अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी नेहमीच रिमिक्सपेक्षा मूळ गाण्यांना प्राधान्य दिले आहे. अनेकांना असेच वाटते. ‘आज फिर तुम पे’ बद्दलची माझी टिप्पणी रिमिक्सबद्दल होती, गायकाबद्दल नाही. रिमिक्सने मूळ गाण्याला न्याय दिला पाहिजे. नव्वदच्या दशकातील अनेक गाणी पुन्हा तयार केली गेली आहेत परंतु ती मूळ गाण्यांना न्याय देत नाहीत. आम्ही संगीतकारांनाही आदरांजली वाहिली आहे, पण ते सन्मानपूर्वक केले गेले.” आधी पती, मग तरुण मुलाला गमावलं; आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना आनंद देणाऱ्या या गायिकेने मात्र सोसलं खूप दुःख ‘आज फिर तुम पे’ हे गाणे मूळत: पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. ‘दयावान’ चित्रपटातील हे गाणे विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. हे गाणे ‘हेट स्टोरी 2’ साठी रिक्रिएट करण्यात आले असून ते अरिजित सिंग आणि समीरा कोप्पीकर यांनी गायले आहे. अनुराधा पौडवाल यांच्याविषयी सांगायचं तर त्यांनी बॉलिवूडमध्ये एक सो एक हिट गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाच्या जोरावर या गायिकेने बॉलीवूड चित्रपटातील रोमँटिक गाणी तर हिट केलीच पण त्यांच्या आवाजातील भजनांच्या कॅसेटने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आपल्या मधुर आवाजाने अनुराधा यांनी एकेकाळी बॉलिवूडमध्ये एवढी कीर्ती मिळवली होती की, त्यांची तुलना लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज गायिकांसोबत होऊ लागली होती. आजही त्यांची भजनं आणि गाणी सामान्य लोकांमध्ये हिट आहेत.