मुंबई 03 ऑगस्ट: अवघ्या एकाच आठवड्यात बस बाई बस या झी मराठीवरील कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. येत्या आठवड्यात या मंचावर अजून एक खास आणि प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार आहेत. त्या म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. अमृता फडणवीस यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसून आलं आहे. या भागात अमृता फडणवीस (amruta fadanvis on zee marathi) एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. अमृता यांची अजून एक ओळख म्हणजे मामी. देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असं म्हटलं जातं तर त्या न्यायाने अमृता यांना मामी अशी ओळख मिळाली आहे. या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना या ओळखीबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर त्या व्यक्त झाल्या, “मला तर मामी म्हणून संबोधतात ते फारच आवडतं.मला फारच मजा येते.” तसंच या प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, “अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?” मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.
अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे. हे ही वाचा- Lokesh Gupte: ‘मन अटक गया है’; शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेता झाला भावुक अमृता या सोशल मीडियावर देखील बऱ्याच सक्रिय आहेत. त्या आवर्जून अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावताना नेहमीच दिसून येतात. त्यांच्यासोबत रंगलेला हा भाग नक्कीच मनोरंजन करणारा असणार अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. झी मराठीवरील या कार्यक्रमात मागच्या आठवड्यात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी पवार विरुद्ध शिंदे या वक्तव्याने त्यांनी धमाल आणली होती. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये अमृता खानविलकर ही अभिनेत्री उपस्थित होती.