मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांची मुलंही नेहमी चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच स्टार किड्सचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग झालेला पहायला मिळतो. अशातच आज बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याची मुलगीही चर्चेचा विषय ठरतेय. याचं कारही काही खासच आहे. अक्षयची मुलगी निताराचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर आपली लेक नितारासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, ‘माझा हात पकडण्यापासून ते स्वत:ची शॉपिंगची बॅग पकडण्यापर्यंतच्या प्रवासात माझी मुलगी वेगाने मोठी झाली आहे. आज तू दहा वर्षांची झाली आहेस. माझे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत. बाबाकडून तुला खूप प्रेम’. अक्षयच्या या भावूक पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघे वाळवंटातल्या एका टेकडीवर चढताना दिसत आहे. याशिवाय निताराचा तिची शॉपिंगची बॅग उचलतानाचा फोटोही या व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय. या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप साऱ्या कमेंट करत पोस्ट लाईकदेखील केली आहे. अक्षय कुमार नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
दरम्यान, अक्षयच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, त्याचा नवीन चित्रपट ‘कटपुटली’ या महिन्याच्या सुरुवातीला डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर चाहत्यांना अक्षय जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुच्चासोबत राम सेतूमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.