मुंबई, 2 मे : मुंबईसह संपूर्ण देशभरात 29 एप्रिलला लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. सामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूडमधील कलाकारांनीही यावेली मतदानाचं कर्तव्य बजावलं. पण बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा मात्र या संपूर्ण दिवसभरात कुठेही दिसला नाही. बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकारानं मतदानानंतर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे देशभक्तिचा ब्राँड अॅम्बेसिडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारच्या फोटोची सर्वांना उत्सुकता होती. मात्र अक्षयचा असा कोणताही फोटो पाहायला मिळाला नाही.
अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्यानं तो भारतात मतदान करू शकत नाही. पण यामुळे सोशल मीडियावरून त्यावर बरीच टीका झाली आणि या गोष्टीचं अक्षयला फार वाईटही वाटलं त्यानं याबाबत कोणतंही ट्वीट केलं नाही. मात्र एका इव्हेंटमध्ये रिपोर्टरने याबाबत त्याला प्रश्न विचारला असता अक्षयनं अशा अंदाजात उत्तर दिलं की, त्यावरुन त्याला या गोष्टीचा राग आल्याचं स्पष्ट जाणवलं.
मतदान न केल्यानं सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेबाबत अक्षयला यावेळी त्याचं मत विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना अक्षय सुरुवातीला हसला मात्र नंतर 'चला' असं म्हणतं तो तिथून निघून गेला. त्यानंतर तो त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका माणसासोबत काहीतरी संभाषण करताना दिसला. त्यानंतर अक्षयच्या या प्रतिक्रियेचीही सोशल मीडियावर नव्यानं चर्चा पहायला मिळाली. सोमवारी 29 एप्रिलला अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना मतदान केंद्रावर दिसली मात्र त्यावेळी ती एकटीच होती आणि ती सुद्धा तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर भडकलेली पाहायला मिळाली. त्यामुळे तिनं अक्षयशी संबंधित प्रश्न टाळण्यासाठी असं केलं असावं असं म्हटलं जात आहे.