मुंबई, 26 जुलै : अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. ‘OMG 2’मधील कथा जाणून चाहत्यांमध्ये उत्सुकता तर आहेच पण अक्षयच्या एकूण लूकवरून काही प्रेक्षक त्याच्यावर नाराज देखील झालेत. नेटकऱ्यांनी अक्षयला हिंदू धर्माची खिल्ली न उडवण्याचा सल्ला देखील दिला. त्यातच सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाच्या रिलीजवर सध्या बंदी घातली असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाबाबत अतिशय काळजीपूर्वक पावले उचलत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या रिव्हाइजिंग टीमने हा सिनेमा पाहिला. स्क्रिनिंगला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी स्वतःही उपस्थित होते. काही दिवसनापूर्वी सेन्सॉर बोर्डानं चित्रपटावर तात्पुरती बंदी घातली होती. तर आता निर्मात्यांना चित्रपटात 20 कट सुचवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर चित्रपटाला A म्हणजेच ऍडल्ट प्रमाणपत्र देण्यात आलं असल्याची माहिती आहे.
चित्रपटाला A प्रमाणपत्र देणे म्हणजे 18 वर्षाखालील मुले चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत. यामुळेच अक्षय कुमार आणि ‘ओह माय गॉड 2’चे निर्माते यांच्यावर आता मोठं संकट आलेलं आहे. Kangana Ranaut : जावेद अख्तरसोबत कायदेशीर लढाईत कंगनाला धक्का; कोर्टानं फेटाळले गीतकारावरील ‘हे’ आरोप चित्रपटाला वेळेवर प्रमाणपत्र मिळाले तर अक्षय कुमारच्या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या गदर २ या चित्रपटाशी होईल. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अमिषा पटेल देखील आहे. हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या गदरचा सिक्वेल आहे, जो ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटाविषयी देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनांच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे OMG 2 ला गदर २ शी टक्कर घेणं महागात पडू शकतं. सीबीएफसी कार्यकारी समितीने चित्रपट पाहिल्यानंतर प्रदर्शित झालेल्या गाण्यात रिलीज डेट गायब होती. रिलीजसाठी फारच काही दिवस शिल्लक असताना, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा अंतिम निर्णय अक्षय कुमार घेणार असल्याची शक्यता आहे. मात्र सध्या तो देशाबाहेर आहे. अशा परिस्थितीत चित्रपट पुढे ढकलावा लागेल असे बोलले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. रिपोर्ट्सनुसार, जिओ सिनेमा अॅपसोबत मेकर्सची डीलही सुरू होती. कदाचित 90 कोटी रुपयांत हा करार होणार होता, पण नंतर अचानक चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट फक्त थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र आता पुढे नक्की काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अक्षय कुमारच्या चाहत्यांना आहे.