मुंबई, 16 सप्टेंबर : अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असणारा चित्रपट ‘थँक गॉड’ येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पण या चित्रपटात हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून आधी यूपीतील एका वकिलाने दिग्दर्शक इंद्र कुमार आणि संपूर्ण कलाकारांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता चित्रपटासमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता कर्नाटकातील हिंदू जनजागृती समितीने धार्मिक भावनांची खिल्ली उडवल्याबद्दल या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘थँक गॉड’मध्ये अजयने चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरविषयी इंडिया टुडेशी बोलताना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा म्हणाले की, ‘‘चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आम्ही हिंदू धर्मातील देव चित्रगुप्त आणि यम यांची खिल्ली उडवू देणार नाहीत.’’ हेही वाचा - Boyz 3 : बेळगावमध्ये होतोय बॉईज 3’ ला तीव्र विरोध; चित्रपटातील ‘त्या’ दृष्यांवर आहे आक्षेप सेन्सॉर बोर्डाने ‘थँक गॉड’ला प्रमाणपत्र देऊ नये आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. वृत्तानुसार, या गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
याआधी, हिमांशू श्रीवास्तव नावाच्या उत्तर प्रदेशातील वकिलाने इंदर कुमार, अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याविरुद्ध जौनपूर न्यायालयात खटला दाखल केला आहे. हिमांशूने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, ‘चित्रगुप्त प्रत्येक मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतो आणि त्याला कर्माचा देव मानला जातो. अशा परिस्थितीत देवांचे असे चित्रण योग्य नाही आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.’
हिमांशूच्या म्हणण्यानुसार, ‘ट्रेलरमध्ये चित्रगुप्त आधुनिक कपड्यांमध्ये सूट-बूट घातलेला दाखवण्यात आला आहे. यासोबतच अजय हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत आक्षेपार्ह भाषा वापरत आहे आणि विनोद करत आहे.’ याचबरोबर आता ट्विटरवर सुद्धा या चित्रपटाच्या बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. ‘थँक गॉड’ हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा विंनोदी चित्रपट असून या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.