मुंबई, 09 मे: दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट मागच्या काही महिन्यांपासून नेहमीच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. अनेकांनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सकडे बोट दाखवले, यात राम आणि रावणाच्या व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली होती. आता या सगळ्या वादानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून आता त्याचा बहुचर्चित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरीस ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी, 9 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. यात प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग, लंकापती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान तर हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे दिसत आहे. हैदराबादमध्ये ट्रेलर लॉन्चसाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. तसंच चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंगही ठेवण्यात आलं होतं. यामुळे हा ट्रेलर आधीच सोशल मीडियावर लीक झाला होता. पण आता तो अधिकृतपणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.
आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रभू रामाचा वनवास, सीतेचं अपहरण, राम आणि शबरीची भेट, हनुमानजींचा सीतेचा शोध आणि शेवटी रावणाचा क्रुरपणा आणि शेवटी भयानक युद्धाची झलक असं सगळंच ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर चित्रपटाच्या VFX मध्ये खूप बदल केलेले पाहायला मिळत आहेत. ऋषी कपूरच्या ‘या’ अभिनेत्रीला झालेला तुरुंगवास; त्या एका चुकीमुळे बरबाद झालं करिअर अनेक सीन्स असे आहेत जे पाहताना तुम्ही थक्क होता.तसेच प्रेक्षकांच्या मागणीप्रमाणे ट्रेलरमध्ये प्रभू श्रीरामांचे कपडे, सीतेची वस्त्र, तिच्या भांगात लावलेला सिंदूर असे अनेक बदल केलेले पाहायला मिळत आहेत. आता प्रेक्षक या ट्रेलरला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.
यापूर्वी जेव्हा चित्रपटाचा टीझर आला होता तेव्हा त्याचे खराब दर्जाचे व्हीएफएक्स, रामापासून सीतेपर्यंतच्या कपड्यांवरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता सर्व बदल केल्यानंतर अंतिम ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, टीझरनंतर ज्या प्रकारचा वाद झाला आहे, त्यानुसार सिनेमात बदल करण्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली होती. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि सनी सिंह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात 3D मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हिंदी व्यतिरिक्त, तुम्ही तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील पाहू शकता.