मुंबई, 07 जून : प्रभास, क्रिती सेनॉन आणि ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चा फायनल ट्रेलर रिलीज केला, ज्याला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्मात्यांनी तिरुपती येथे चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. यानंतर चित्रपटाची टीम तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली. पण तिथे ओम राऊतने क्रिती सेनॉनला निरोप देताना केलेल्या कृतीमुळे एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून यूजर्स संतापले आहेत. त्याचवेळी भाजपच्या एका नेत्यानेही याविषयी ट्विट करत आक्षेप नोंदवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये क्रिती सेनन, प्रभास आणि दिग्दर्शक एम राऊत मंदिर परिसरात आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर क्रीती पुन्हा तिच्या गाडीजवळ आली तेव्हा ओम राऊतने तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर कीस केलं. दोघांनी मंदिरात अशाप्रकारे किस आणि मिठी मारल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण एका भाजप नेत्याने ट्विट करत या प्रकारावर आक्षेप घेत आदिपुरुषच्या टीमवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून ओम राऊतच्या या कृतीचा तीव्र निषेध करत आहेत. आंध्रप्रदेशमधील बीजेपी नेते रमेश नायडू यांनी याबद्दल ट्वीट करत आक्षेप नोंदवला आहे. Prabhas: प्रभासच्या लग्नाचं ठिकाणही ठरलं! ‘या’ देवस्थानी पार पडणार अभिनेत्याचा विवाहसोहळा गुडबाय करताना मिठी मारणे किंवा चुंबन घेणे ही बॉलिवूडकरांसाठी सामान्य बाब आहे. मात्र भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू यांनी मंदिरात अशी कृती केल्याने आक्षेप नोंदवला आहे. यावर त्यांनी आक्षेप घेत ट्विट केलं असून प्रभास आणि क्रिती सेनॉनला टॅगही केलं. रमेश नायडू यांनी लिहिले, ‘मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशी कृत्ये करणे आवश्यक आहे का? भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात असे चुंबन घेणे आणि मिठी मारणे… हे अजिबात मान्य नाही. हे पूर्णपणे अपमानास्पद आहे.’ मात्र, नंतर रमेश नायडू यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले.
‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सेनन माता जानकीची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी हिट होत असून आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.