मुंबई, 13 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून अनेक निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच मराठी मनोरंजन सृष्टीतूनही एक वाईट बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाची मृत्यू झाला आहे. तिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा - नवं आयुष्य सुरु करण्याआधीच काळाचा घाला, मराठी अभिनेत्रीचा दुर्दैवी शेवट कल्याणीच्या मृत्यूची बातमी समोर येताच तिच्या इन्स्टाग्रामचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असून तिला श्रद्धांजली दिली जात आहे. कल्याणीने इन्स्टाग्रामवर केलेली शेवटी पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेच. कल्याणीने तिच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली होती. कल्याणीने आठवड्याभरापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. कल्याणीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती भाकरी थापताना दिसत आहे. सोबतच तिनं व्हिडीओला लक्षवेधी असं कॅप्शन दिलंय.
व्हिडीओ शेअर करत कल्याणीने लिहिलं, ‘काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली… मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.’ तिच्या या पोस्टवर युजर्स कमेटं करत श्रद्धांजली देत आहेत.
दरम्यान, कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता. याशिवाय ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. ती विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची.