मुंबई, 23 सप्टेंबर- मॉडेल आणि अभिनेत्री ब्रूना अब्दुल्लाने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. स्वतः ब्रूनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मुलीचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. दरम्यान तिने मुलीच्या जन्मावेळचा एक फोटो शेअर करत तिने पाण्यात (Water Delivery) मुलीला जन्म दिल्याचं सांगितलं. ब्रूनाने पती आणि मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'मी गरोदर होण्याआधीच ठरवलं होतं की माझ्या बाळाची वॉटर डिलीव्हरी करणार. माझी मुलगी या जगात कोणत्याही औषधांच्या वापराशिवाय यावी असंच वाटत होतं. तिने नैसर्गिक पद्धतीने या जगात यावं ही माझी इच्छा होती. मी एका शांत ठिकाणाची निवड केली जिथे मी माझ्या मुलीला नैसर्गिक पद्धतीने या जगात आणेन आणि माझ्यासोबत फक्त ते लोक असतील ज्यांच्यासोबत राहणं मला आवडतं. मी फार नशीबवान होती की मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या.'
ब्रूनाने पुढे लिहिले की, 'माझ्या मुलीला मी गरम पाण्याच्या आत पती, आई आणि डॉक्टरांच्या सहाय्याने जन्म दिला. या दिवसासाठी मी स्वतःला तयार केलं होतं. नियमित व्यायाम, योग्य आहार, मेडिटेशन आणि वॉटर डिलिव्हरीबद्दलची माहिती गोळा करत मी स्वतःला तयार केलं. शनिवारी मुलीचा जन्म व्हावा असं मला वाटतं होतं. तसंच लेबर पेन 4 तासांपेक्षा जास्त नसावं असंही वाटत होतं. मुलीचा जन्म नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही औषधांशिवाय व्हावा असं मला वाटत होतं आणि नेमकी तसंच झालं.'
ब्रूनाने 31 ऑगस्टला मुलगी इजाबेलाला जन्म दिला. ब्रूनाच्या मते, आई झाल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती म्हणाली की, 'माझं माझ्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या आयुष्यात एवढं प्रेम कोणावरच करू शकत नाही.'