मुंबई 13 ऑगस्ट: मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर येत्या काळात देशातील प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये दिसून येणार आहे. अमृता आणि नृत्य यांचं नातं खूप घट्ट आहे हे एव्हाना चाहत्यांना कळलं आहेच पण त्यांच्या लाडक्या अमुची डान्स जर्नी भलतीच स्पेशल आहे. याबद्दल स्वतः अमृताने तिच्या नव्या युट्युब व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे. तर चाहत्यांच्या लाडक्या चंद्राचा नृत्याचा प्रवास कसा सुरु झाला माहित आहे का? अमृताचा नृत्यप्रवास 1994साली सुरु झाला. बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये तिच्या नृत्याची सुरुवात झाली. गणेशत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं त्यामध्ये तिने नाच करायला सुरुवात केली. “मला कोणी विचारलं मला कोणते नृत्यप्रकार येतात तर मी सांगेन काहीच नाही आणि खूप काही. मी नृत्याचं शिक्षण घेतलेलं नाही. माझ्यामध्ये नाचाचं अंग आहे पण त्याच शास्त्रोक्त शिक्षण मी घेतलेलं नाही. लहानपणी माझ्या आई-बाबांना कधी वाटलं नव्हतं की पुढे जाऊन मला नाचामध्ये एवढी रुची असेल पण मी गणपतीच्या वेळी अगदी दोन महिने आधीपासून तयारी कारायचे. मुलामुलींना गोळा करा, गच्चीत जाऊन डान्सची तालीम करा, त्याकाळात चित्रहारवर माधुरी दीक्षितची गाणी यायची ती पुन्हा पुन्हा बघा, कॅसेट खराब होईपर्यंत वापरा असं सगळं मी लहानपणी केलं आहे.
मी एवढ्या कॅसेट रिवाईंड करून खराब केल्या की माझ्या वडिलांना प्रश्न पडायचा की नेमकं मी काय करते. मला मेरा पिया घर आया हे गाणं खूप आवडायचं. तर अशा पद्धतीने मी अनेकांना शिकवत शिकत इथवर आले. आणि आज संपूर्ण लोककलेवर आधारित सिनेमा ज्यामध्ये नृत्याचा एवढा मोठा वाटा आहे तो करायला मिळणं त्याला प्रेक्षकांनी एवढा भरभरून प्रतिसाद देणं आणि आता माझ्या इन्स्पिरेशनसमोर डान्स करणं हे सगळं स्वप्नवत आहे.” अमृताच्या चंद्रमुखी सिनेमाला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तिला चंद्रा अशी वेगळी ओळख मिळाली. त्यामध्ये तिच्या सगळ्या नृत्यांचं सुद्धा खूप कौतुक झालं. सध्या अमृता ‘झलक दिखला जा’च्या नव्या जर्नीसाठी खूप उत्सुक झाली आहे.