मुंबई, 4 ऑक्टोबर : 'फुलाला सुगंध मातीचा' ही स्टार प्रवाहवरील मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. आता मालिकेत एका परमेश्वर स्वरुप स्वामीजी अशा पात्राची एन्ट्री होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामीजी हे पात्र, भूमिका अभिनेते गिरीश ओक साकारणार आहेत. विविध चित्रपट, मालिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारलेले गिरीश ओक आता मात्र या मालिकेत पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहेत.
या भूमिकेविषयी गिरीश ओक यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. 'मी याआधी अश्या प्रकारची भूमिका केलेली नाही. त्यामुळेच करताना मजा येतेय. मला वरकरणी जे दिसत नाहीत पण प्रत्यक्षात वेगळे असतात अशी पात्र साकारायला आवडतात. याआधी मी बरीच सात्वीक पात्र साकारली आहेत. त्यामुळे फुलाला सुगंध मातीचा मालिकेत स्वामीजी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याची लकब ही प्रेक्षकांच्या मनात कायम रहाते आणि त्याला लोकप्रियता मिळते. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल अशी आशा आहे. मी दिग्गज अभिनेते प्राण यांचा चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची प्रेक्षकांवर छाप सोडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो.'
स्वामीजींच्या येण्याने कीर्तीसमोर मात्र नवं संकट उभं ठाकणार आहे. आता या संकटाचा सामना ती कशी करते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
दरम्यान, याआधी फुलला सुंगध मातीचा (Phulala Sugandha Maticha) ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या मालिकेत दाखवल्या गेलेल्या काही दृश्यांविरोधात LGBT कम्युनिटीने तक्रार दाखल केली होती. या दृश्यांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. (LGBT File Complaint) या मालिकेद्वारे त्यांचा अपमान केला जातोय असा आरोप करत त्यांनी कायदेशीररित्या तक्रार दाखल केली होती.
या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी शुभम ही मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसतो. कथानकानुसार त्याने एका पाककला स्पर्धेत भाग घेतला. याच स्पर्धेत सँडी नावाचा एक स्पर्धक देखील आहे. हा सँडी समलैंगिक आहे. या सँडीची त्यांच्या लैंगिकतेवरुन मालिकेत खिल्ली उडवली गेली असा आरोप केला. स्पर्धा सुरु असताना सँडी आणि शुभमची आई म्हणजेच जीजी अक्का यांच्यामध्ये झालेल्या संवादावरुन LGBTQIA+ कम्युनिटीने आक्षेप घेतला होता. ‘फुलाला सुगंध मातीचा’ही सुपरहिट हिंदी मालिका ‘दिया और बाती हम’चा रिमेक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment