नवी दिल्ली, 04 मे : जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून आपला देश कोरोनाशी लढत आहे. या लढाईमध्ये प्रत्येकजण मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाविरोधातील या युद्धामध्ये बॉलिवूड कलाकारांनी देखील मोठा निधी उपलब्ध केला आहे. अक्षय कुमार, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत, आमीर खान, सलमान खान या सर्व बड्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी देखील या लढाईत त्यांचा वाटा उचलला आहे. मराठी कलाकार देखील यामध्ये पुढे सरसावले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, अभिनेता आमीर खान (Aamir Khan) याने पैशांचं वाटप छूप्या पद्धतीने केलं. म्हणजे गव्हाच्या पॅकेट्समधून त्याने अनेकांना मदत केली. त्याचं अभिनंदनही या व्हिडीओतून करण्यात आले आहे. मात्र व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मागील सत्यता आज स्वत: आमीर खानने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे. (हे वाचा- रिंकू राजगुरुचा हॉट लुक सोशल मीडियावर हिट, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा ) आमीरने आज ट्विटरवर असं लिहिलं आहे की, ‘मित्रांंनो, गव्हाच्या पिशव्यांमध्ये पैसे ठेवणारा तो व्यक्ती मी नव्हे. एकतर ही कहाणी खोटी आहे किंवा या ‘रॉबिनहूड’ला सर्वांसमोर यायचे नाही आहे. सुरक्षित राहा. प्रेम’. गव्हाच्या पिशवीतून पैसे वाटणारा कोण होता याबाबत अद्याप माहिती नाही किंवा हा व्हिडीओ खरा होता की खोटा याबाबतही स्पष्ट झालेलं नाही. मात्र तो आमीर खान नाही हे मात्र या ट्वीटनंतर स्पष्ट झाले आहे.
संपादन - जान्हवी भाटकर

)







