मुंबई, 15 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही सध्याची सर्वात लोकप्रिय मराठी मालिका आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्धच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेतील कांचन आणि अनिरुद्ध दोघांचे फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अर्चना पाटकर यांचे कौतुक करत मालिकेदरम्यान शूट केलेल्या भावुक सीन मागची गोष्ट सांगितली आहे. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सगळं अनिरुद्धच्या मनासारखं झालं असलं तरी तो एकटा पडला आहे. त्याच्या बाजूने फक्त कांचन म्हणजे त्याची आई आहे. त्याच धर्तीवर नुकतंच मालिकेत एक सीन शूट करण्यात आला. तो सीन शूट करतानाचा किस्सा मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. त्यांनी लिहिलंय कि, ‘‘एकेकाळी कर्तृत्ववान अनिरुद्ध आता फारच असह्य झाला आहे, त्याची व्यथा तो सतत मांडत असतो, अरूधतीला यश मिळाला आहे , ती खूप पुढे निघून गेलेली आहे , म्हणून त्याला त्रास होतो , असं जे सगळ्यांना वाटतं तसं नाही आहे,अमिताभ बच्चन जया भादुरी चा “अभिमान " सिनेमासारखं नाही आहे असं तो म्हणतोय, हे सगळं तो जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो आहे, त्याची आई सोडल्यास , म्हणजेच कांचन आई सोडल्यास , दुसरा कोणाचाही त्याच्यावर आता भरोसा , विश्वास राहिलेला नाहीये, शेवटी कांचन आई ती बिचारी आई आहे, तीच आपल्या मुलाला आधार देणार, आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते , मग ती अनिरुद्ध ची आई असली तरी शेवटी ती आईच आहे’’
या पोस्टमध्ये त्यांनी अर्चना पाटकर यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणतायत कि, ‘‘अर्चनाताई पाटकर यांनी हा सीन खूप छान केला, emotional scenes त्या खरच खूपच छान करतात, scene सुरू व्हायच्या आधी त्या मिश्किलपणे हसत असतात, पण एकदा का सीन सुरू झाला , की चटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येत, त्यांचे डोळे भरून येतात , आवाजात एक वेगळाच कंप निर्माण होतो, समोरच्याच्या काळजाला जाऊन तो असा भिडतो की समोरच्या कलाकारांचे ही डोळे भरून येतात, या scene मध्ये त्यांच्याकडे पाहिलं आणि माझेही डोळे भरून आले.’’ हेही वाचा - Sundara manamadhye bharali: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट; अभ्याची मालिकेतून एक्झिट? मिलिंद गवळीची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी देखील कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलंय कि, ‘खरंच काळजाला भिडणारा सीन होता तो’, तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय, ‘या मालिकेचे सर्वात मोठी बाजू म्हणजे उत्कृष्ट डायलॉग आणि कलाकारांचे सुंदर अभिनय’.
‘आई कुठे काय करते’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम वरच्या क्रमांकावर असते. याही आठवड्यात मालिकेला सर्वात जास्त टीआरपी मिळाला आहे. मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येतात, संकटं येतात पण सगळेजण मिळून त्यावर मात करतात. या गोष्टींमुळेच मालिका चाहत्यांना आवडते.