मुंबई, 12जुलै : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाई पण भारी देवा’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या स्त्रियांच्या ओठांवर याच सिनेमाचं नाव आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या चित्रपटाला शुभेच्छा देत आहेत. 30 जूनला रिलीज झालेल्या या सिनेमाने अवघ्या दहा दिवसात २६ कोटींचा गल्ला जमावलाय. विशेषतः महिला वर्गाचा या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आई म्हणजे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधतीने चित्रपटाच्या टीमला खास शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणाली ती जाणून घ्या. ‘आई कुठे काय करते’ ही महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेतील आईचे अनेक चाहते आहेत. अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने हिट केली आहे. मधुराणी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचं फॅन फॉलोईंग देखी जबरदस्त आहेत. तर दुसरीकडे ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट महाराष्ट्रात गाजतो आहे. मधुराणीने या चित्रपटाच्या टीमसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला असून टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत मधुराणीने म्हटलंय कि, ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट पाहून आल्यावर या सिनेमाच्या टीमचं कौतुक करायला मी हा व्हिडीओ करतेय. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यापासूनच मी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायचा असं ठरवलं होतं. असंच महाराष्ट्रातील नाही तर जगभरातील बायकांनी ठरवलं असणार. म्हणूनच हा चित्रपट एवढा चांगला चालतोय.’ पुढे तिने दिग्दर्शक केदार शिंदेंचे आभार मानत म्हटलंय की, ‘केदार सर धन्यवाद, तुम्ही एवढा सुंदर चित्रपट बनवला. सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा खूपच छान दाखवल्यात.’ असं म्हणत तिने पुढे सगळ्या कलाकारांचं कौतुक करत ‘तुम्ही काय चाबूक कामं केलीयेत’ असं म्हणत सगळ्यांचं कौतुक केलं आहे. ‘बाईपण भारी’ साठी कायपण! महिलांनी लढवली भन्नाट शक्कल; 100 जणींनी बसवारी करत गाठलं थिएटर या व्हिडिओमध्ये तिने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘गेली अनेक अशा सुपरहिट चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीला गरज होती’ असं देखील तिने म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी, ‘आम्हीही हा सिनेमा पहिला, ‘खूपच छान चित्रपट आहे’ असं म्हटलं आहे. तर तिच्या एका चाहत्यानं ‘तू या चित्रपटात असतीस तर अजून मजा आली असती’ असं देखील म्हटलं आहे.
‘बाई पण भारी देवा’ सांगायचं तर या चित्रपटाने मराठी चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. हा सिनेमा एका दिवसात सर्वाधिक कलेक्शन करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.