मुंबई, 30 डिसेंबर : छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ . या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील सर्व कलाकारही घराघरांत पोहचले असून सतत चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील मुख्य चेहरा म्हणजे अरुंधती. मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रकाश झोतात असते. नुकतंच मधुराणी प्रभुलकरला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्रीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. मधुराणीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिलं, ‘आई आणि मुलीचा व्हॅकेशन टाईम’. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही येत असलेल्या पहायला मिळत आहे. काही युजर्सनी मधुराणीने घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल केलं होतं.
एका युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिलं, सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुक मधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात. आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असे नाही. मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात. या व्यक्तीच्या कमेंटवर मधुराणीने चोख उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.
मधुराणी म्हणाली, ‘मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात नं’. मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.