मुंबई, 20 मे : आई कुठे काय करते या मालिकेने नुकतेच 1000 भाग पूर्ण केले आहेत. मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यात आता वीणाची एंट्री झाली आहे. वीणा आशुतोषची मानलेली बहिण असली तरी ती अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याचं समोर आलं. अनिष आणि इशाच्या साखरपुड्यात वीणाच्या येण्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. त्यात वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याने सगळेच चिंतेत आलेत. या सगळ्यात अरुंधती मात्र अनिरुद्धचं खरं रूप वीणाला सांगणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधती वीणाशी सविस्तर बोलताना दिसणार आहे. वीणाच्या वडिलांचा बिझनेस अनेक वर्ष आशुतोष पाहत असतो. मात्र वीणानं अचानक त्या बिझनेसची जबाबादारी स्वत:वर घेऊन अनिरुद्धला तिचा बिझनेस पार्टनर बनवलं आहे. अनिरुद्ध देखील वीणाशी गोड बोलून नवं वादळ आणण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अनिरुद्धचं वीणाशी एकंदरीत वागणं सर्वांना खटकत आहे. मागील भागात आपण पाहिलं की वीणा आणि अनिरुद्ध यांच्यात बिझनेस पार्टनरची डिल होते. अनिरुद्ध वीणाला पार्टनरशिपच्या पेपर्सवर सही करण्यास सांगतो. पण वीणा मात्र मी आशुतोषशी बोलून सही करेन असं सांगते. त्यावर अनिरुद्ध चांगलाच चिडतो. हेही वाचा - ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकात भरत जाधव आई-वडिलांना घालायचे शिव्या? काय आहे प्रकरण ? येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अनिरुद्ध पार्टनरशिपचे पेपर्स घेऊन केळकरांच्या घरी येतो. तिथे आशुतोष आणि नितीन पेपर्स वाच असं वीणाला सांगतात. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, “मी सगळं वाचलं आहे. आक्षेप घेण्यासारखं त्यात काहीच नाहीये”. त्यावर नितीन म्हणतो, “मला सगळं एकदा नीट वाचायचंय”. त्यावर आशुतोष नितीनला थांबवतो. यावर वीणा लगेच पेपर्सवर साइन करते.
इथे अरुंधती तिच्या फॉरेन ट्रिपसाठी तयारी करत असताना वीणा तिथे येते. तेव्हा अरुंधती वीणाला अनिरुद्धपासून सावध राहण्याचा सल्ला देते. ती वीणाला सांगते की, “अनिरुद्ध विश्वासाहार्य नाहीत”. त्यावर वीणा, “तिला तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांग असं म्हणते”. “तू जे काही करशील ते करताना डोळे उघडे ठेव”, असा सल्ला अरुंधती वीणाला देते. “मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे”, असं वीणा अरुंधतीला सांगते. “तरीही अरुंधती तिला अनिरुद्धच्या बाबतीत सावध राहा”, असं अरुंधती सांगते. आता अरुंधतीनं वीणाला दिलेला सल्ला किती उपयोगी येणार? अनिरुद्ध वीणाचा वापर करून कोणता खेळ खेळणार? हे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.