मुंबई, 12 मे : ‘आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ’. येणारे दिवस येत असतात जाणारे दिवस जात असतात. कोणीही कितीही दूर गेलं तरी आई मात्र आपल्या बाळापासून कधीच दूर जात नाही. स्वप्न पाहण्यासाठी एक रात्रही खूप असते पण स्वप्नपूर्तीसाठी एक आयुष्य देखील कमी पडतं. स्वप्न आणि सत्य यात फक्त प्रयत्नांचं अंतर असतं, असं कायम तिची आई तिला सांगत आलीये. आज ती आघाडीची अभिनेत्री आहेच पण तिच्या घराचा आणि आई वडिलांचा भक्कम आधार आहे. तिची आई इतर आयांप्रमाणे पण काहीशी वेगळी. आई -वडील मुलांना वाचायला, लिहायला बोलायला शिकवतात. पण इथे लेकचं आपल्या आई-वडिलांचे शब्द बनली. मुकबधिर असलेल्या आई-वडिलांच्या बोलक्या लेकीबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊया. ‘रूंजी’, ‘जुळून येती रेशमीगाठी’, ‘बापमाणूस’, ‘वर खाली दोन पाय’, ‘वाय सो गंभीर’, ‘कुसुम मनोहर लेले’ सारख्या नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील. ‘रूंजी’ या मालिकेतून पल्लवीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पल्लवीच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सातत्यानं होत आलीये पण तिच्या आयुष्यातील अशी गोष्ट जी आजवर फारशी समोर आलेली नाही. हेही वाचा - अभिनेता संग्राम समेळबरोबर घटस्फोट का घेतला? पल्लवी पाटील स्पष्टच बोलली अभिनेत्री पल्लवी पाटील, मुकबधिर आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेली बोलकी, हुशार, प्रेमळ लेक. तिच्या आईचं नाव मंदा पाटील. वडील नेव्हीमध्ये सरकारी नोकरी करतात. मुकबधिर आई वडिलांनी तिला कसं वाढवलं याविषयीचा तिचा प्रवास तिनं एका मुलाखतीत सांगितला. पल्लवी म्हणाली, “जेव्हा मला कळायला लागलं की माझे आई-वडील इतर आई वडिलांपेक्षा वेगळे आहेत. माझी आई मला सतत जाणीव करून द्यायची की तू आमच्याकडे बघ आणि इतरांच्या आई-वडिलांकडे बघ. आमच्यात फरक आहे आणि तुझ्यावर जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची जाणीव ती मला सतत करून द्यायची. ती रोज मला दुकानात घेऊन जायची. तुला काय हवंय ते त्याला सांग म्हणायची. ती मला ऑफिसलाही घेऊन जायची. नाती बनवणं, नाती जपणं, संवाद साधणं हे मी माझ्या आईकडून शिकलेय. तिनं मला भाषा नाही शिकवली पण त्या भाषेचा अर्थ, त्यातलं बोलकेपण हे मी तिच्याकडून शिकलेय”. पल्लवी पुढे म्हणाली, “मला जेव्हा कळायला लागलं की आपले आई-वडील मुकबधिर आहेत. तेव्हा मला वाईट वाटायचं. शाळेत इतर मुलांचे आई वडील त्यांच्या मुलांच्या तक्रारी घेऊन यायचे. मग मी म्हणायचे की, माझी आई का येत नाही? कधी कधी सर देखील मला रागात म्हणायचे की, उद्या तुझ्या पालकांना घेऊन ये. पण नंतर त्यांना कळायचं की हिच्या पालकांना बोलावून काही होणार नाही. हे जेव्हा माझ्या कळायचं तेव्हा ती मुद्दाम माझ्या समाधानासाठी शाळेत यायची. माझ्या तक्रारी सांगायची. त्या तक्रारी देखील मी माझ्या सरांना सांगायचे. मग ती मला शाळेत उगाच धपाटा मारायची”. हेही वाचा - Pallavi Patil : नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नावेळी पल्लवीने का टाकलेले ते बोल्ड फोटो? अभिनेत्रीनं अखेर सांगितलं कारण “आईने माझा चौथीपर्यंतचा अभ्यास घेतला. तिने मला चित्रकला शिकवली. जे तिला शक्य होतं ते तिनं मला सगळं शिकवलं. मला कधीच आपले आई-वडील नॉर्मल नाहीयेत याचं खंत वाटली नाही. हळूहळू मी कलाक्षेत्राकडे वळले. आधी डान्स मग नाटक याकडे मी वळले. या सगळ्यात प्रवासात ती माझ्या बरोबर होती, आहे आणि आयुष्यभर राहिलं. मी आज जे करतेय ते तिच्यामुळे करतेय. मला तिला जगातील सगळे आनंद द्यायचे आहेत. तिला विमानात बसायचं आहे, तिला दुबईला जायचं आहे. तिची सगळी स्वप्न मी पूर्ण करणार आहे”.
पल्लवीनं पुढे सांगितलं, “माझ्या जन्मानंतर मला 10 वर्षांनी लहान बहिण झाली. तिचं आयुष्य फार सुखकर झालं. कारण ती उठायची, रडायची हे मला आधी कळायचं. मग मी आई उठवायचे. जेव्हा मला आईची गरज होती तेव्हा ती माझ्याबरोबर होती. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीची तिने मला जाणीव करून दिली. संस्कारापासून सगळ्या गोष्टी ती मला सांगत होती आणि तशीच मी घडत गेले”. पल्लवी शेवटी म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे त्यांना देखील माझा अभिमान आहे. मी आयुष्यभर त्यांना सांभाळत राहीन. दोघांची आयुष्यातील सगळी स्वप्न मी पूर्ण करणार आहे. बाबा नेव्हीमध्ये नोकरीला आहेत. मला ज्या गोष्टी येतात त्या मला माझ्या बाबांनी शिकवल्या. मला अनेक साइन लॅग्वेज येतात त्या मला बाबांनी शिकवल्या. मला फ्रेंच, जर्मन, अमेरिकन, स्पॅनिश अशा या सगळ्या साइन लॅग्वेज बाबांनी शिकवल्या. दोघांनी मला बोलून, भाषेतून काहीच शिकवलं नाही. पण त्यांच्याकडे बघून मी शिकत गेले”.