पुणे, 25 डिसेंबर : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली येथील बैलगाडा घाटात किरकोळ कारणावरून एका बावीस वर्षीय तरुणाची कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचा मित्र सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे हे चिखली येथील बैलगाडा शर्यत घाटातील महादेवाच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. यापूर्वी सोन्या शिंदे याचा आरोपी आदित्य पाटोळे याच्यासोबत काही कारणांमुळे वाद झाला होता. जुन्या भांडणाच्या कारणातून सोन्या आणि त्याचा मित्र जिथे गप्पा मारत होते तिथे आरोपी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव हे आले. त्यांनी काही कळण्याच्या आतच सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे याच्यावर कोयत्याने व तलवारीने सपासप वार केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा : बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारायला गेला तो परतलाच नाही; लातूरच्या घटनेने खळबळ
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान याप्रकरणी चिखली पोलिसांनी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव या चार आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Pune, Pune crime, Pune news