यवतमाळ, 18 ऑगस्ट : वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर 22 वर्षीय माथेफिरूने चाकू हल्ला केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैशाली चल्लावार असे शिक्षिकेचे नाव आहे.
पीडित शिक्षिका या वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. त्या आपल्या परिवारासह चंद्रपूरला ये-जा करतात. शिक्षिका आपले अध्ययनाचे कार्य पार पाडून शाळा सुटल्यावर चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. या दरम्यान संबंधित घटना घडली.
पीडित शिक्षिका या शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या नायगाव फाट्यावर आल्या, यावेळी वाहनाची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरु युवकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. आरोपी हल्ला करुन पळून जाण्याचा बेतात होता. पण अखेर आरोपीला पोलिसांनी पकडलं आहे.
(बारामतीत भर दिवसा भयानक घटना, शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला)
तरुणाच्या हल्ल्यात शिक्षिका जखमी झाल्याचं काही नागरिकांना कळताच त्यांना घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्लेखोर माथेफिरु युवक स्वतः चे नाव राजू अन्सारी सांगत असून त्याचे जवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही.
शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याने चाकू हल्ला का केला? हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Yavatmal