नवी दिल्ली 12 एप्रिल : आईसारखं प्रेम (Mother Love) आपल्या बाळावर जगात इतर कोणीही करू शकत नाही, असं म्हटलं जातं. ‘आई असली की घराला घरपण येतं,’ ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,’ अशा अनेक म्हणी आणि आईचं प्रेम तुम्हीही अनुभवलं असेल. आपल्याला काही झालं तर रात्ररात्र जागून काळजी घेणारी आई, आपल्या मुलांसाठी उपाशी राहणारी आई, आईची अशी अनेक रूपं तुम्ही पाहिली असतील. परंतु, याला अपवाद महिलादेखील आहेत. नुकतंच सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आपल्या आईच्या क्रूरपणाची माहिती देताना एका तरुणाला अश्रू अनावर झाले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी पार पडली. या प्रकरणातील दाम्पत्य जवळपास दोन दशकांपासून वेगळं राहतंय. त्यांना एक मुलगा असून तो 27 वर्षांचा आहे. हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहतोय. या मुलाचे वडील गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या पत्नीला घटस्फोट (Divorce) मागत आहे, परंतु ती घटस्फोट देत नसल्याने हे प्रकरण प्रलंबित आहे. अखेर यावर सर्वोच्च न्यायालयात वाद-प्रतिवाद सुरू आहेत. महिलेच्या हत्येच्या प्रकरणात पतीने केला भिकाऱ्यावर आरोप; शेवटी समोर आलेलं सत्य जाणून सगळेच हादरले सुनावणीच्यावेळी आईचं प्रतिनिधित्व करणार्या वकिलाने खंडपीठाला तिच्या मुलाशी बोलण्याची परवानगी मागितली. परंतु मुलगा नकार देत होता. तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुलाला त्याच्या आईशी बोलण्यास सांगितले. न्यायालयात वैयक्तिकरित्या उपस्थित असलेल्या 27 वर्षीय तरुणाने न्यायालयात सांगितले की, तो सात वर्षांचा असताना त्याची आई त्याला मारहाण करायची आणि बाथरूममध्ये बंद करायची (Mom tortured son). आपल्या वेदनादायी बालपणाची (Childhood) आठवण करून देताना मुलगा म्हणाला, “माझ्या आईशी बोलल्याने माझ्या वेदनादायी आठवणी परत जाग्या होतील. कोणती आई आपल्या सात वर्षांच्या मुलाला मारते? ती बाहेर जायची तेव्हा मला बाथरूममध्ये बंद करून जायची. मी तासन् तास बाथरूममध्ये बंद असायचो. ती मला मारायची मात्र, माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीच हात उचलला नाही.” पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली तर मुलाला झाडावर फासावर लटकवले, निर्दयी बापाच्या कृत्याने नगर हादरलं दरम्यान, मुलाने कोर्टात अशी माहिती दिल्यानंतर त्याच्या आईच्या वकिलाने सांगितलं की ‘मुलगा रचलेली एक खोटी कथा सांगत आहे आणि असं काहीही झालेलं नाही.’ त्यावेळी खंडपीठानं म्हटलं की ‘तो 27 वर्षांचा तरुण आहे आणि त्याला स्वतःची समज आहे. त्यामुळे त्याला खोटी कथा सांगण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही.’ या संदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय. सुनावणीवेळी कोर्टात पतीच्या वकील अर्चना पाठक दवे म्हणाल्या की, ‘मुलाच्या आईने आपल्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कधीही न्यायालयात धाव घेतली नाही. त्यामुळे कलम 142 अन्वये अधिकार वापरून हा वाद मिटवावा आणि कोर्टाने दोघांचा घटस्फोट मंजूर करावा, अशी पतीची इच्छा आहे.’ तर, आईच्या वकिलाने सांगितले की, तिला घटस्फोटाचा कलंक घेऊन जगायचं नाही. या जोडप्याने 1988 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये पतीने पत्नीला क्रूरतेच्या कारणावरुन घटस्फोट मागितला आणि तेव्हापासून हे दोघे वेगळे राहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.