आगरतळा, 7 जून : त्रिपुरा राज्यातील (Tripura) एक 22 वर्षीय तरुण घरातून गायब (Youngster Missing) झाला होता. मात्र, एका महिन्याने तो घरी परतला. यावेळी त्याने जे पाहिले, त्यामुळे त्याला धक्काच बसला. तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की, त्याचे श्राद्ध घातले जात असल्याची तयारी सुरू आहे. ही घटना वेस्ट त्रिपुरा (West Tripura) जिल्ह्याच्या कालीबाजार परिसरातील आहे. काय आहे घटना - याठिकाणी एकीकडे तरुणाच्या नातेवाईकांना आनंद होत आहे. तेच दुसरीकडे ते पोलिसांबद्दल रागही व्यक्त करत आहेत. त्याचे कारण असे की, मोहनपूर उपविभागाच्या कालीबाजार येथीर रहिवासी आकाश सरकार मागील एक महिन्यापासून गायब होता. 3 जून रोजी पश्चिम आगरतळा पोलीस स्टेशन अंतर्गत मेलरमठ जवळील तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला होता. प्राथमिक तपासात मृत कालीबाजार येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता. यानंतर पोलिसांनी आकाश सरकारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह (Dead Body) मिळाल्याची माहिती दिली. मोहनपूरचे उपविभागीय अधिकारी के. बी. मुजुमदार म्हणाले, “आकाशचे वडील प्रणव सरकार जीबीपी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांची बॅग, पॅंट आणि टॅब पाहून त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह ओळखला.” शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रणव सरकार यांच्याकडे सोपवण्यात आला आणि कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. “हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याने, आम्ही तपास करू आणि जे काही आवश्यक असेल ते करू”, असेही पोलीस म्हणाले आहेत. वडिलांचे म्हणणे काय - तर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दबाव टाकल्याचे तरुणाच्या वडिलांचे म्हणणे आहे. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, “मी पोलिसांना वारंवार सांगितले की, तलावातून सापडलेला मृतदेह माझ्या बेपत्ता मुलासारखा दिसत नाही. मात्र, पाण्यात बुडल्याने मृतदेह फुगला, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, पिशवीत सापडलेली टॅब्लेट आणि पॅन्ट माझ्या मुलाची आहे, पण तो इतका फिट नाही.”, असेही त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. हेही वाचा - Pune Crime News : माजी सैनिकाचं पत्नी आणि सासूसोबत धक्कादायक कृत्य, आरोपीसह भावालाही… दरम्यान, आकाशने सांगितले की, तो बटाला पुलाजवळ राहत होता आणि नुकताच तो त्याच्या एका बहिणीला भेटायला गेला होता. “आज तिने फोन केला आणि मी घरी परतल्यावर माझे श्राद्ध होत आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटले.”, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.