आसाम, 31 मे: आसाम (Assam) मध्ये बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. आसामच्या चारैदेव जिल्ह्यात नुकतीच कोरोनामुक्त झालेल्या महिलेवर (allegedly raped) बलात्कार झाल्याचं समजतंय. रुग्णालयातून परत येत असताना दोन नराधमांनी या महिलेला रस्त्यात गाठलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले. या पीडितेचं कुटुंब सध्या रुग्णालयात कोविडचे (Covid treatment) उपचार घेत आहे. पीडित महिलेची कोविडची चाचणी नकारात्मक आल्यानं तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पीडित महिला आपल्या मुलीसोबत रुग्णालयातून घरी परत येत होती. त्याचवेळी दोघांनी महिलेचं अपहरण केलं आणि तिला जवळच्या चहाच्या बागेत नेलं. बागेत नेऊन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना 27 मे रोजी घडली आणि दोन दिवसानंतर या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबियातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे एका आठवड्यासाठी आम्ही सर्व होम आयसोलेशन होतो. मात्र त्यानंतर माझ्या वडिलांची आणि आईची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं पीडित महिलेच्या मुलीनं सांगितलं. हेही वाचा- काळजी घ्या! राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात घोंघावतेय कोरोनाची तिसरी लाट रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर माझ्या आईची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानं तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आम्हाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आम्ही घरी जाण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र त्यांनी रुग्णवाहिका मिळणार नसल्याचं सांगितलं. कोरोना कर्फ्यू असल्यानं आम्ही आजची रात्री रुग्णालयात राहू शकतो असं रुग्णालय प्रशासनाला विचारले. त्यावरही रुग्णालयातल्या प्रशासनानं नकार दिला, असं पीडित महिलेच्या मुलीनं म्हटलं आहे. रुग्णवाहिकेसाठी नकार मिळाल्यानंतर आम्ही रुग्णालयातून चालत घरी निघालो. आम्ही चालत असताना दोन जणांनी आमचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यांना बघून आम्ही पळण्यास सुरुवात केली. पण त्यांनी माझ्या आईला पकडलं आणि तिला घेऊन गेले. मी धावत जाऊन गावकऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. तब्बल दोन तासांनंतर माझ्या आईचा शोध लागल्याचं मुलगी सांगते. हेही वाचा- वाईट! संशयावरुन एकाचा घात, बेदम मारहाणीत जमावाकडून एकाची हत्या रुग्णालय आणि पीडित महिलेचं गाव यामध्ये जवळपास सुमारे 25 किमीचं अंतर आहे. आम्ही आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी केली असून रिपोर्ट येणं बाकी असल्याचं चारैदेव वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर सिंह यांनी सांगितले. आसामचे आरोग्यमंत्री केशब महंता यांनी घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. कोविड-नकारात्मक रूग्णांना घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.